अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे नुकसान होईल काय ?

Ashok Chawhan
Ashok Chawhan

ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. तसंच, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं. परंतु, आज त्यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली

प्रतिक्रिया कळवा

माध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले, “आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे. दुपारी बारा-साडेबारा वाजता पक्षप्रवेश होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अन्य जिल्ह्यांतील संभाव्य प्रवेश होण्याची शक्यता आहे.”

लोकांच्या मनात उत्सुकता

“जिल्ह्यातील, मतदारसंघातील बरेच लोक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. नवीन सुरुवात करायची आहे. जिल्ह्यातील समीकरणे आहेत, हे सगळं लक्षात घेऊन पुढील वाटचाल चांगली व्हावी असा प्रयत्न आहे आमचा”, असंही चव्हाण म्हणाले.

राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण काय म्हणाले होते?

“मी कालपर्यंत काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. भाजपामध्ये जाण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. पक्षाने खूप काही दिले, हे मान्य. मात्र मीही पक्षासाठी खूप काही केले आहे. आपण कोणत्याही आमदाराच्या संपर्कात नाही. मात्र इतर काय निर्णय घेतली, हे मला सांगता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी काल राजीनामा दिल्यानंतर दिली होती.

भाजपात कोणतं पद मिळणार ?

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचे काम केले आणि ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. एका मोठ्या नेत्याला भाजपाने गळाला लावल्यामुळे त्यांचे अनेक समर्थक काँग्रेसमधून फुटण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेले राधाकृष्ण विखे-पाटील, कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह यांना मोठी पदे दिल्याचा इतिहास आहे. आता अशोक चव्हाणांनाही मोठ्या पदाचे आश्वासन दिले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *