थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, २६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पिकांची केली पाहणी; शेतकऱ्यांना दिला धीर

परभणी, दि. २६ (जिमाका) : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. उभ्या पिकांचे नुकसान होत असताना त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. झालेल्या नुकसानाची योग्य ती दखल घेऊन, सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिली.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी आज परभणी जिल्ह्यातील मरडसगाव (ता. गंगाखेड), दैठणा (ता. परभणी) व पाथरी येथील शेतकऱ्‍यांच्या शेतात प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी आस्थेने संवाद साधला आणि ‘हिम्मत खचू देऊ नका, संकटाच्या या काळात शासन तुमच्या पाठीशी आहे,’ असा धीर दिला.

दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. खरीप हंगामातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा आहे. या निर्णयाचा लाभ परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना होणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी दिली.

पाहणीच्या वेळी, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश विटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, माजी आमदार मधुसुदन केंद्रे, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, संगीता चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भास्कर कोळेकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, कैलास वाघमारे, नितीन गर्जे, उषाकिरण श्रृंगारे, ऋषिकेश सावंत, तालुका कृषि अधिकारी गोविंद कोल्हे यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, पावसाचा खंड पडल्यामुळे शेतीतील पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाला प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

मी स्वतः मराठवाड्याची लेक आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि येथील दुष्काळी परिस्थितीची मला जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या अडचणींची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चारा आणि पाण्याबाबत शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्याबाबत शासन आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही आवश्यक ती मदत करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्याचे सांगत त्यांनी परभणी जिल्ह्यातील परिस्थितीचाही प्रत्यक्ष आढावा घेतला.

यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पावसातील प्रदीर्घ खंड, भविष्यातील पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चाऱ्याची गरज याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी मरडसगाव (ता. पालम) येथील अझर अहमद मोहोयुद्दीन सरवर, दैठणा (ता. परभणी) येथील शेषराव हरिभाऊ गायकवाड, पाथरी येथील बालासाहेब साहेबराव नाईक या शेतकऱ्‍यांच्या शेतात जावून पाहणी केली.

***

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *