थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करा – मंत्री शिवेंद्रराजे भोसले

राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करा – मंत्री शिवेंद्रराजे भोसले

  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी देणार दुष्काळनिधीसाठी एक दिवसाचा पगार
  • लघु कंत्राटदारांच्या थकीत देयकांसाठी ‘ट्रेड्स’ संकल्पना राबविणार

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात पायाभूत सुविधांची भूमिका महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला अनुरूप वेगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने काम करावे. रस्ते आणि पुलांपुरते मर्यादित न राहता राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अभियंता दिन २०२६ निमित्त मागील दोन वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री भोसले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन उत्कृष्ट अभियंते व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण सभागृहात अत्यंत साधेपणाने झालेल्या या कार्यक्रमास यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव (रस्ते) शरद राजभोज, सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश निघोट, सचिव (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, सचिव (प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना) प्रशांत औटी, मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांच्यासह विभागाचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी आपल्या अधिकारांचा प्रभावी वापर करून संबंधित यंत्रणांकडून रस्ते, पूल आणि इमारतींची कामे गुणवत्तापूर्ण, टिकाऊ व वेळेत पूर्ण करून घ्यावीत. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवावे. रस्त्यांची मालकी कोणत्या यंत्रणेकडे आहे, याची माहिती अनेकदा नागरिकांना नसते. त्यामुळे रस्त्यांशी संबंधित प्रत्येक बाबीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाहिले जाते. समाजमाध्यमांमुळे कामांमधील त्रुटी तातडीने नागरिकांसमोर येतात. या पार्श्वभूमीवर अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली असून प्रत्येकाने गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने १०० दिवसांत पूर्ण केलेला सायकल ट्रॅक, त्यावर झालेली आंतरराष्ट्रीय सायक्लोथॉन स्पर्धा, नाशिक येथील इमारत, सातारा जिल्ह्यातील पूल आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक यांसारखी कामे विभागाच्या क्षमतेची अनेक उदाहरणे आहेत, असे सांगून, अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी लक्ष देऊन कामांची तपासणी केल्यास दर्जेदार आणि टिकाऊ कामे निश्चितपणे पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्री भोसले म्हणाले की, थकीत देयकांमुळे प्रत्येक विभागातील कंत्राटदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लघु कंत्राटदारांना या अडचणीतून दिलासा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘ट्रेड्स’ संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विभागाने ही संकल्पना यशस्वी केल्यानंतर अन्य विभागांच्या देयकांसाठीही तिचा वापर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे विभागाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी.

कोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी ७० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथील इमारत व आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निर्णय घेऊन काम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरात विविध संवर्गांतील एक हजारांहून अधिक पदोन्नती पूर्ण केल्या आहेत. विभागातील सेवा प्रवेश नियमावली अंतिम टप्प्यात असून कर्मचारी संघटनांची मते व सूचना विचारात घेऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.

अधिकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार दुष्काळ निधीसाठी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दुष्काळ निधीसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे. या पुढाकाराबद्दल भोसले यांनी संघटनेचे अध्यक्ष अभियंता प्रमोद माने आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मंत्री भोसले म्हणाले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी. बैठका व कार्यक्रम साधेपणाने आयोजित करावेत आणि प्रत्येक बाबतीत जबाबदारीने वागावे.

अभियंत्यांनी कल्पकता व तांत्रिक कौशल्यातून विकासकामांना गती द्यावी – मिलिंद म्हैसकर

अभियांत्रिकी म्हणजे कल्पकता, नवनिर्मिती आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्याचा संगम आहे. थॉमस अल्वा एडिसन, निकोला टेस्ला, अलेक्झांडर ग्राहम बेल, हेन्री फोर्ड आणि राइट बंधू यांच्या संशोधनांचा दाखला देत अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी अभियांत्रिकीमुळे मानवी जीवनात झालेल्या परिवर्तनाचा आढावा घेतला.

म्हैसकर म्हणाले की, अभियंत्यांनी कल्पकता, तांत्रिक कौशल्य आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या बळावर राज्यातील महत्वाचे प्रकल्प गुणवत्तापूर्ण व प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. अभियांत्रिकी क्षेत्राने मानवी जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणले असून अभियंत्यांमध्ये समस्यांचे अचूक आकलन करून प्रभावी उपाय शोधण्याची क्षमता विकसित होते. हीच क्षमता प्रशासन आणि विकासकामांच्या नियोजन-अंमलबजावणीतही उपयुक्त ठरते.

सर विश्वगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा संदर्भ देत सक्षम अभियंते आणि प्रभावी टीम कोणत्याही प्रकल्पाच्या यशासाठी महत्त्वाची असल्याचे सांगून त्यांनी कोयना धरण, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याच्या अभियंत्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले असल्याचे सांगितले.

विविध महत्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी अभियांत्रिकीची असून, विकासकामांच्या नियोजन व अंमलबजावणीत त्यांच्या अभियांत्रिकी दृष्टिकोनाचे महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात सचिव राजभोज म्हणाले की, अभियंत्यांनी अधिकारी न होता अभियंते म्हणूनच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कामावर लक्ष ठेवावे. आपल्याकडे उत्कृष्ट अभियंत्यांचा वारसा आहे, हा वारसा जपणे महत्वाचे आहे. अभियंत्यांनी रस्ते, पूल आणि इमारतींच्या बांधकामापुरती भूमिका मर्यादित न ठेवता पायाभूत सुविधा सुरक्षित, टिकाऊ, पर्यावरणपूरक आणि नागरिकांच्या गरजांना पूरक राहतील, यासाठी नियोजनापासून प्रत्यक्ष क्षेत्रीय कामापर्यंत सक्रिय सहभाग घ्यावा.

वैयक्तिक व सामूहिक पुरस्कारांचे वितरण

यावेळी २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील उत्कृष्ट अभियंता, उत्कृष्ट रस्ते, उत्कृष्ट पूल आणि उत्कृष्ट इमारत अशा विविध विभागांतील तीस हून अधिक वैयक्तिक व सहा सामूहिक पुरस्कारांचे वितरण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

०००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *