
नवी दिल्ली, दि. २९ : मानवी जीवन आणि समाजात विचारांची कमतरता नाही. संत-महात्म्यांचे विचार, संस्कार, मूल्ये आणि सेवाभाव आचरणात आणल्यासच सशक्त समाज आणि राष्ट्राची निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर (अमरावती) आणि अखिल भारतीय महानुभाव परिषद, अमरावती यांच्या समन्वयाने तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात ‘भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव’ आणि एकात्मिक राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष श्री कारंजेकर बाबा, मराठी विद्यापीठाचे अविनाश आवलगावकर, सांवली मूर्ती मंदिराचे महंत सनातन मुनी शहापूरकर, अहिल्यानगरचे पूनम बाईजी, महंत श्रीवर्धनस्थ बिडकर बाबा रणाइचे,जामोदेकर बाबा, कृतिका शास्त्री, शहापूरकर बाबा, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुलआदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा गौरव करताना श्री. गडकरी म्हणाले की, श्री चक्रधर स्वामींचे विचार व तत्त्वज्ञान समजून घेऊन ते मन, शरीर आणि आत्म्यात रुजविल्यास मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. शेकडो वर्षांपूर्वी मानव कल्याणासाठी स्वामींनी मांडलेले विचार आजच्या काळातही समाजनिर्मिती आणि मानवी जीवन सुखी करण्यासाठी तितकेच मार्गदर्शक आहेत.
संत-महात्म्यांचे विचार आणि त्यांचा जीवनमार्ग संघर्षाच्या काळात माणसाला बळ देतात तसेच संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देतात, असेही त्यांनी सांगितले.
माता-पिता आणि गुरूंकडून मिळणारे शिक्षण, प्रशिक्षण आणि संस्कार हे मुलांच्या भावी आयुष्याची पायाभरणी करतात, असे सांगून श्री. गडकरी म्हणाले की, जसा कुंभार मातीला आकार देतो, त्याप्रमाणे योग्य विचार आणि संस्कारांच्या माध्यमातून मानवी मनाचे परिवर्तन घडवून आणता येते. केवळ सत्ता आणि संपत्तीवर लक्ष केंद्रित न करता समाजातील तळागाळातील नागरिकांच्या जीवनात सुख, समाधान निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून महानुभाव साहित्य, भगवान श्री चक्रधर स्वामींचे तत्त्वज्ञान तसेच मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जडणघडणीत महानुभाव वाङ्मयाचे योगदान यावर विविध मान्यवर, साहित्यिक, अभ्यासक आणि तज्ज्ञांनी विचार मांडले. चर्चासत्रात सहभागी वक्त्यांनी महानुभाव साहित्याची समृद्ध परंपरा, त्याचे भाषिक व सांस्कृतिक महत्त्व आणि समकालीन संदर्भातील उपयुक्तता यावर प्रकाश टाकला. सुत्रसंचलन गौरव व्यास यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित महानुभाव पंथाच्या ग्रंथप्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनात महानुभाव पंथाचा इतिहास, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जीवनकार्य, तत्त्वज्ञान तसेच महानुभाव साहित्याची समृद्ध परंपरा यांची माहिती देणारे विविध ग्रंथ आणि साहित्य प्रदर्शित करण्यात आले होते. श्री. गडकरी यांनी प्रदर्शनाची पाहणी करून संबंधितांकडून ग्रंथ व साहित्याविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी समन्वयक हरिहर पांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनचरित्र व विचारांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिसंगीत तसेच परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

Leave a Reply