थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

महानुभाव साहित्याच्या समृद्ध परंपरेवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र

महानुभाव साहित्याच्या समृद्ध परंपरेवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र

नवी दिल्ली, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर (अमरावती) आणि अखिल भारतीय महानुभाव परिषद, अमरावती यांच्या समन्वयाने तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सदन येथे आयोजित महानुभाव साहित्याच्या समृद्ध परंपरेवर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात या साहित्याच्या महाराष्ट्र संस्कृतीच्या जडणघडणीतील योगदानाचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र सदनात यानिमित्ताने आयोजित महानुभाव साहित्याच्या विशेष ग्रंथप्रदर्शनाचे व चर्चासत्राचे उद्घाटन भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. चमू शास्त्री यांच्या हस्ते झाले. मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर अध्यक्षस्थानी होते. तर महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, बाबासाहेब बिडकर, प्रमुख समन्वयक हरिहर पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रदर्शनात महानुभाव साहित्य परंपरेशी संबंधित दुर्मिळ, प्राचीन आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ मांडण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनातून महानुभाव साहित्याची समृद्ध परंपरा, वैचारिक वारसा तसेच मराठी भाषेच्या विकासातील  महत्त्वपूर्ण योगदानाचा परिचय करून  देण्यात आला.

चर्चासत्राच्या प्रथम सत्रात ‘अभिजात महानुभाव साहित्याचे स्वरूप व वैशिष्ट्ये’ या विषयावर सखोल विचारमंथन झाले. या सत्राचे अध्यक्षस्थान महानुभाव साहित्य व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. बाबासाहेब बिडकर यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन डॉ. किरण वाघमारे यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासनाचे प्रमुख महंत डॉ. सोनपेठकर बाबा, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरचे अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे, पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाचे डॉ. हंसराज जाधव आणि नागपूर विद्यापीठातील श्रीचक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख डॉ. भारतभूषण शास्त्री यांनी सहभाग घेतला. या सत्रात महानुभाव साहित्याची प्राचीनता, त्यातील व्याकरणशुद्धता, भाषिक वैशिष्ट्ये आणि मराठी भाषेच्या विकासातील योगदान यावर विविधांगी चर्चा करण्यात आली.

द्वितीय सत्रात ‘महानुभाव साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान’ या विषयावर विचारमंथन झाले. या सत्राचे अध्यक्षस्थान उपाध्यक्ष कुलाचार्य प.प. महंत श्रीवर्धनस्थ बिडकरबाबा (रणाईचे) यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन अश्विनी पंजाबी यांनी केले. म. श्री गोपीराजबाबा शास्त्री, म. सैंगराजदादा सातारकर, म. श्री सारंगधरबाबा पंजाबी आणि म. श्री नितीनदादा बांधकर यांनी सहभाग घेत महानुभाव साहित्याने तत्कालीन समाजजीवनाला दिलेली दिशा, सामाजिक मूल्यांची जपणूक आणि सांस्कृतिक परंपरांच्या संवर्धनातील योगदान यावर विचार मांडले.

तृतीय सत्रात ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत महानुभाव पंथाचे योगदान’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. या सत्राचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी भूषविले. डॉ. कीर्ती कुलकर्णी, श्री. अजित चव्हाण, श्री. दीपक पाटील आणि सौ. पौर्णिमा पंडित यांनी या सत्रात सहभाग घेतला. महानुभाव पंथाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक जडणघडणीत बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेवर यावेळी चर्चा करण्यात आली. बाराव्या शतकात उदयास आलेल्या या पंथाने लोकभाषेचा पुरस्कार करून मराठी गद्याच्या विकासाला चालना दिली. ‘लीळाचरित्र’ या आद्य चरित्रग्रंथासह विविध ग्रंथांच्या माध्यमातून अहिंसा, समता आणि मानवतावादी मूल्यांच्या प्रसारात महानुभाव साहित्याने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.श्री. अजित चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले.

महानुभाव साहित्याची अभिजात परंपरा, त्याचे भाषिक व साहित्यिक वैशिष्ट्य,सामाजिक-सांस्कृतिक योगदान आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतील ऐतिहासिक भूमिका या विविध पैलूंवर या राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून सखोल विचारमंथन झाले. दिल्ली परिसरातील अभ्यासक, संशोधक, भाविक मोठ्या संख्येने या चर्चासत्रास उपस्थित होते.

0000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *