थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

बाप्पाचा उत्सव जागतिक वारसा ठरावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बाप्पाचा उत्सव जागतिक वारसा ठरावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २९ : सार्वजनिक गणेशोत्सवातून निर्माण होणारे सामाजिक अभिसरण, समाजातील एकोपा, उत्साह आणि ऊर्जा यांची जगाला ओळख व्हावी, तसेच बाप्पाचा उत्सव जागतिक स्तरावर पोहोचून त्याला जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, या उद्देशाने ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (bappa.org) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

द एशियाटिक सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या घरातील गणपती उत्सवाची गाथा bappa.org यावर अपलोड करून या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला. तसेच ‘बाप्पा रथ’ या राज्य सांस्कृतिक चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थी आणि शिल्पकारांनी साकारलेली १२ फूट उंचीची आकर्षक मोदकाची कलाकृती या चित्ररथाचे विशेष आकर्षण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे ४० हजार गावांपर्यंत पोहोचून तेथील गणेशमूर्ती, गणेशोत्सवाच्या परंपरा आणि त्यांच्याशी जोडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कथा जगासमोर मांडण्यात येणार आहेत. देश-विदेशातील बाप्पाची विविध रूपे, गणेशभक्तांचे अनुभव तसेच काळानुरूप बदलत जाणाऱ्या गणेशभक्तीचे स्वरूप या डिजिटल मंचावर अनुभवता येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

श्री गणेशाची भारतासह आशियातील अनेक देशांमध्ये आराधना केली जाते. जपानसारख्या देशातही श्री गणेशाची मंदिरे आहेत. बाल गणेशापासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत बाप्पाशी असलेले भावनिक नाते, विविध भागांतील श्रद्धा, परंपरा आणि उत्सवाचे सामाजिक स्वरूप व्यापक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न या मंचाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मोदक’ विविध ठिकाणी नेण्यात येणार असून, त्याच्या प्रवासाच्या माध्यमातूनही बाप्पाशी संबंधित विविध कथा आणि सांस्कृतिक परंपरा पुढे आणल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाची परंपरा जगासमोर पोहोचविण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

‘बाप्पा डॉट ओआरजी’ हे व्यासपीठ घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवांशी जोडलेल्या ‘गणेशकथा’ एकत्रित करून त्या जगासमोर मांडणार आहे. गणेशोत्सवाच्या परंपरा, प्रथा, श्रद्धा आणि वैशिष्ट्यपूर्ण कहाण्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, प्रत्येक घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची स्वतंत्र कथा प्रभावीपणे मांडून महाराष्ट्राच्या या समृद्ध सांस्कृतिक परंपरेकडे युनेस्कोचेही लक्ष वेधण्याचा संकल्प या उपक्रमामागे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वारसा आणि विकास यांची सांगड घालण्याची संकल्पना सातत्याने मांडली आहे. गणेशोत्सव हा देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून, त्याच्याशी संबंधित कथा आणि परंपरा जगभर पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात श्रीपाद अष्टेकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकरीता ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्य विभाग आणि eFlag corp pvt Ltd यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, eFlag Corp Pvt. Ltd.चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद आष्टेकर तसेच मुंबईकर नागरिक उपस्थित होते.

0000

संजय ओरके/विसंअ

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *