आगग्रस्तांच्या मदतीला धावून आले केवलराम काळे

Smart Maharashtra News Network  : 

शिंदी बु. येथील नुकसानग्रस्त कुटुंबियांना माजी आ. काळे यांची मदत



शिंदी बु. अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथील आदिवासी कुटुंबाच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घराची राखरांगोळी तर झालीच, अन्नधान्य व सर्व साहित्याचाही कोळसा झाला, उघड्यावर आलेल्या या कुटुंबांच्या मदतीला ऐनवेळी माजी आ. केवलराम काळे धावून आले व त्यांनी आगग्रस्तांचे सांत्वन करून तत्काळ आर्थिक मदत दिली.
शिंदी बु. ते पोही रस्त्यावर गेल्या १५ वर्षांपासून नलसू धुर्वे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. गेल्या रविवारी मध्यरात्री अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यावेळी नलसू धुर्वेसह पत्नी व दोन मुली आत झोपलेल्या होत्या. आग लागल्याचे लक्षात येताच सर्वांनी घराबाहेर पळ काढला. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. सर्वांनी पाणी टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले;

 परंतु आग एवढी भीषणहोती की संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यात अन्नधान्य व सर्व सामानाचा कोळसा झाला. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले व त्यांचा संसार उघड्यावर आला. त्यांची राहण्याची तर सोडाच जेवणाचीही सोय नव्हती. ही माहिती कळताच तलाठी लहाडके यांनी पंचनामा केला; परंतु त्यांना कसलीही आर्थिक मदत मिळाली नाही. अशातच ही माहिती मेळघाटचे माजी आ. केवलराम काळे यांना कळताच ते या कुटुंबांच्या मदतीला धावून आले. त्याचे सांत्वन करून तत्काळ आर्थिक मदत दिली व शासकीय अधिकाऱ्यांना फोनलावून लवकर मदत देण्यात यावी, अशी मागणी केली.

 केवलराम काळे यांच्या या तत्काळ आर्थिक मदतीमुळे आगग्रस्त कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी धुर्वे कुटुंबातील सदस्यांनी काळे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माजी ग्रा.पं. सदस्य सुनील रोडे, शिवसेना सर्कलप्रमुख अमोल तिखिले, देवानंद गजभिये, ग्रा.पं. सदस्य शे. इस्माईल शेख बहाद्दर, संघेश गावंडे, मो. जाकीर, संजय पेटकर, दीपक मसने, अरूण ठवळी, संजय साबे, रवी ताथोड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *