
सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवाला अधिक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक आयाम प्राप्त होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या परंपरा, कला, संस्कृती, लोकजीवन, हस्तकला आणि वारसा जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती व प्रचारमोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे ‘Bappa.org’ या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून गणेशोत्सवाचे दस्तऐवजीकरण करणे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजातील आध्यात्मिक व सामाजिक एकोपा तसेच उद्यमशीलतेला चालना देणारी लोकचळवळ आहे. या उत्सवामध्ये स्थानिक कारागीर, मूर्तिकार, कलाकार, हस्तकला करणारे कुशल कारागीर, सजावट करणारे तरुण-तरुणी, तसेच विविध पारंपरिक खाद्यपरंपरा आणि लोककलांचे मोठे योगदान असते. म्हणूनच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने वर्षभर सातत्याने विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाने दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी Bappa.org अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या मंडळाच्या मांडणीतील वैशिष्ट्ये, मूर्ती स्थापना व निर्मितीची पारंपरिक पद्धत, सजावटीची कलात्मक मांडणी, स्थानिक हस्तकला, लोकजीवनाशी निगडित ऐतिहासिक संदर्भ (असल्यास), तसेच खाद्यपरंपरा यांचे छायाचित्रे व माहिती संकलित करून Bappa.org वर नोंदविणे अपेक्षित आहे. तसेच या प्रक्रियेमागील स्थानिक कलाकार, लोककलावंत, मूर्तिकार आणि कारागीर यांची माहिती व त्यांच्या कला-कौशल्याचे दस्तऐवजीकरण करणेही आवश्यक आहे. यामुळे पुढील पिढ्यांसाठी हे ज्ञान जतन होण्यास मदत होईल, तर दुसरीकडे बाहेरील जगाला ‘महाराष्ट्रातील गणेशोत्सवा’ची खरी ओळख मिळेल.
त्याचप्रमाणे ‘घरोघरी बाप्पा’ या उपक्रमातून नागरिकांनाही या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घरगुती गणपती असो किंवा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा गणेशोत्सव—आपल्या घरी बसवलेल्या गणपतीची काही छायाचित्रे आणि थोडक्यात माहिती Bappa.org वर नोंदवा. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना शासनाचे अधिकृत ‘Digital Cultural Preserver Certificate’ प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक वारशाच्या दस्तऐवजीकरणासाठी नागरिकांचा अधिक उत्स्फूर्त सहभाग वाढण्यास मदत होईल.

या मोहिमेचा प्रचार प्रभावीपणे होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, गृहनिर्माण संस्था, RWAs, ग्रामपंचायती, बचत गट तसेच विविध WhatsApp समूहांमध्ये लिंक व QR Code प्रसारित केले जाणार आहेत. प्रचार साहित्य, होर्डिंग्ज, पोस्टर्स, स्टँडीज आणि QR Code अशा विविध माध्यमांतून सर्वत्र संदेश पोहोचवला जाणार आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक वृत्तपत्रे, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सातत्याने प्रसिद्धी दिली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्याचा गणेशोत्सव हा आपल्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक आहे. म्हणूनच सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाच्या कथा—छायाचित्रे, कला, परंपरा व लोकपरंपरा—जगापर्यंत पोहोचवण्यासाठी Bappa.org वर नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
संकलन – जिल्हा माहिती कार्यालय
००००

Leave a Reply