
- मार्गदर्शन आणि शंका निरसनाचा राज्यव्यापी उपक्रम
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. लोकसहभाग, सामाजिक एकोपा आणि जनजागृतीची समृद्ध परंपरा लाभलेल्या या उत्सवाला महाराष्ट्र शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या व्यापक लोकसहभागाचा सकारात्मक उपयोग करून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
‘लोकसंवाद’ हा केवळ शासकीय योजनांची माहिती देणारा उपक्रम न राहता नागरिकांशी थेट संवाद, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे, योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचे मार्गदर्शन आणि पात्र लाभार्थ्यांना योग्य माहिती उपलब्ध करून देणारा संवादाचा मंच ठरत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ग्रामपंचायती तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ, थेट आणि परिणामकारक होण्यास मदत होत आहे.
‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे आणि कृषी अवजारांसाठीच्या अनुदान योजनांची माहिती देण्यात येत आहे. सहकार विभागाशी संबंधित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबतही नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, महिला बचत गट तसेच महिलांसाठीच्या उच्च शिक्षणाच्या विविध सवलती याबाबत माहिती देण्यात येत आहे.
आरोग्याशी संबंधित योजनांची माहितीही या संवादाचा महत्त्वाचा भाग आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, मोफत तपासणी व औषधोपचार यांसारख्या सुविधांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्तीच्या योजनांची माहितीही संबंधित विभागांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
युवक आणि रोजगाराच्या दृष्टीनेही ‘लोकसंवाद’ महत्त्वपूर्ण ठरत आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगारासाठीच्या कर्ज योजना तसेच ‘बार्टी’, ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ यांसारख्या संस्थांच्या विविध योजनांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, क्रीडा व युवक कल्याण, पणन आणि अन्य विभागांच्या योजनांबाबतही स्थानिक गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी विविध क्षेत्रांशी संबंधित शासकीय योजनांची माहिती नागरिकांना मिळत आहे.
आजच्या डिजिटल युगात नागरिकांना शासकीय सेवांचा ऑनलाइन लाभ घेता यावा, यासाठी महाडीबीटी, आपले सरकार, माहितीचा अधिकार आणि सायबर सुरक्षा यांसारख्या विषयांवरही जनजागृती केली जात आहे. योजनांची माहिती मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया कशी करावी, आवश्यक कागदपत्रे कोणती, संबंधित विभागाशी संपर्क कसा साधावा, ऑनलाइन अर्ज किंवा सेवांचा वापर कसा करावा, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत असल्याने नागरिकांसाठी ‘लोकसंवाद’ अधिक उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला आहे. कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण तसेच पोलीस विभागातील अधिकारी स्थानिक पातळीवर आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. जिल्हा माहिती अधिकारी, विभागीय माहिती अधिकारी आणि संबंधित विभागांचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या समन्वयातून कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे.
‘लोकसंवाद-२०२६’ची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणे. योजनांची माहिती ऐकण्याबरोबरच नागरिकांना आपल्या अडचणी मांडता येत आहेत. पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, उपलब्ध सुविधा आणि संबंधित विभागाशी संपर्क याबाबतच्या शंकांचे निरसन अधिकारी करत आहेत. त्यामुळे माहितीपासून मार्गदर्शनापर्यंत आणि मार्गदर्शनापासून सेवांपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देतात. या लोकसहभागाचे प्रभावी माध्यम म्हणून गणेश मंडळांचा उपयोग करून शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची संकल्पना ‘लोकसंवाद-२०२६’मधून प्रत्यक्षात येत आहे. संदर्भातील प्रसिद्धी अहवालांमध्येही विविध जिल्ह्यांतील गणेश मंडळांच्या ठिकाणी नागरिकांशी थेट संवाद साधून योजनांची माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे दिसून येते.
गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा आणि उत्सवाचा विषय नसून महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील लोकसहभागाचे प्रभावी व्यासपीठ आहे. या लोकसहभागाला शासकीय योजनांच्या जनजागृतीची जोड देत ‘उत्सवातून संवाद, संवादातून माहिती आणि माहितीच्या माध्यमातून योजनांचा लाभ’ ही संकल्पना ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुढे येत आहे. शासनाच्या योजना कागदोपत्री किंवा कार्यालयीन चौकटीपुरत्या मर्यादित न राहता त्या नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचाव्यात, नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा आणि योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि शासन-नागरिक संवाद अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम जनजागृतीला लोकसहभागाची प्रभावी जोड देणारा ठरत आहे.
००००
वर्षा फडके – आंधळे
उपसंचालक (वृत्त),
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

Leave a Reply