थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, २० सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनकल्याणाचा सेतू

सेवा संकल्प अभियान : जनमनाचे समाधान

  • जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे आणि शासकीय यंत्रणांना जिल्हा माहिती कार्यालयाचे सक्रिय सहभागाचे आवाहन

ठाणे,दि.२०:- भारतीय संस्कृती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या विचारांचा वारसा लाभलेला गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक प्रबोधन, प्रबोधनात्मक संवाद आणि जनसामान्यांच्या एकोप्याचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. याच लोकोत्सवाचा सकारात्मक आणि रचनात्मक उपयोग करत सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत विविध शासकीय योजना आणि लोककल्याणकारी सेवा पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘लोकसंवाद-२०२६’ हा अत्यंत नाविन्यपूर्ण आणि पथदर्शी उपक्रम हाती घेतला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा तसेच तालुका स्तरीय सर्व शासकीय विभागांच्या सक्रिय समन्वयाने हा उपक्रम सोमवारपासून पुढील चार दिवस संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.

‘लोकसंवाद-२०२६’ या अभिनव उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रशासनाने नागरिकांच्या उत्स्फूर्त गर्दीचा सुवर्णयोग साधला आहे. गणेशोत्सवादरम्यान भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मंडपांमध्ये येतात. या गर्दीच्या आणि सोयीस्कर वेळेचा सदुपयोग करून थेट जनतेशी थेट सुसंवाद प्रस्थापित करणे हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी जिल्ह्यातील प्रमुख, मानाच्या तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर व सुलभ भाषेत माहिती देतील.

या उपक्रमांतर्गत नागरिकांना शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘सेवा संकल्प’, ‘एस.आय.आर.’, महसूल विभागातील विविध दाखले, फेरफार व ऑनलाईन सेवा, तसेच शहरी भागातील महानगरपालिका व नगरपरिषदेच्या नागरी सुविधांची विस्तृत माहिती दिली जाणार आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धन, शिक्षण क्षेत्रातील विविध शिष्यवृत्ती व योजना, सामाजिक न्याय विभाग आणि क्रीडा विभागाच्या कल्याणकारी योजना, बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी देणारा ‘रोजगार महाकुंभ’, आरोग्यविषयक ‘श्री गणेशा आरोग्याचा’ मोहीम आणि गंभीर रुग्णांना संजीवनी देणारा ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’ यांसारख्या अतिशय संवेदनशील व लोकोपयोगी योजनांची सखोल माहिती नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहे.त्याचप्रमाणे सद्य:स्थितीतील वाढत्या डिजिटल गरजा लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाच्या योजनांसोबतच सायबर सुरक्षा, दैनंदिन सुरक्षित डिजिटल व्यवहारांचे ज्ञान, विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध नाविण्यपूर्ण सेवा-सुविधांचा परिचयही या संवादादरम्यान करून दिला जाणार आहे. प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी किमान तीन ते चार प्रमुख योजनांची एका वेळी सविस्तर माहिती देऊन जनतेचे प्रबोधन केले जाईल.

या उपक्रमाची व्यापकता अधिक वाढवण्यासाठी प्रत्येक सादरीकरणाचे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स तसेच सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून यास व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे.

प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानतेचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या या मोहिमेत माहिती व जनसंपर्क विभाग, जिल्हा माहिती कार्यालय तसेच सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशासकीय कार्यालयांची भूमिका अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे. अत्यंत सुनियोजित समन्वय साधून हाती घेण्यात आलेला हा उपक्रम शासकीय योजना आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा अधिक घट्ट करणारा ठरेल यात शंका नाही. जिल्ह्यातील अनेक नामांकित गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या मंडपात जागा उपलब्ध करून देण्यासाठी उत्स्फूर्त तयारी दर्शविली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, सोमवारपासून पुढील चार दिवस चालणाऱ्या या महा-उपक्रमात सर्वांनी पूर्ण क्षमतेने, जबाबदारीने आणि उत्साहाने पुढाकार घ्यावा. आपापल्या संपर्कातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधून मंडपाच्या दर्शनी, सुयोग्य व सुरक्षित ठिकाणी ‘लोकसंवाद-२०२६’ चे माहिती फलक व बॅनर लावावेत आणि बाप्पाच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवून हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘जनकल्याण पर्व’ म्हणून यशस्वी करावा.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *