थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, १६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती; पुणे शहरात ‘लोकसंवाद’ उपक्रमाला प्रारंभ

गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती; पुणे शहरात ‘लोकसंवाद’ उपक्रमाला प्रारंभ

पुणे, दि. १६ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-2026 या विशेष जनजागृती अभियानाला पुणे शहरात प्रारंभ झाला. जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या वतीने आज गुरुजी तालीम गणेश मंडळ आणि तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळ येथे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने या व्यासपीठाचा उपयोग शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती व्यापक स्वरूपात पोहोचविण्यासाठी करण्यात येत आहे. नागरिकांशी थेट संवाद साधणे, योजनांची माहिती देणे आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

गुरुजी तालीम मंडळात कौशल्य विकास योजनांची माहिती

गुरुजी तालीम गणेश मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात कौशल्य विकास व रोजगार अधिकारी दिग्विजय जमादार यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. युवकांसाठी उपलब्ध कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगारासाठीच्या योजना तसेच कौशल्याधारित प्रशिक्षणातून रोजगारक्षमता वाढविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. युवकांनी आपली आवड आणि शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन उपलब्ध कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, तसेच रोजगार व स्वयंरोजगारासाठीच्या शासकीय योजनांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तांबडी जोगेश्वरी मंडळात महिला व बालविकास योजनांची माहिती

तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळ येथे महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महिला व बालविकास निरीक्षण गृहाचे अधीक्षक गजानन चाटे यांनी महिला व बालकांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

महिलांसाठीच्या कल्याणकारी योजना, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या योजनांचा पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

अधिकृत माहितीचा थेट स्रोत

‘लोकसंवाद-2026 अंतर्गत गणेश मंडळांच्या ठिकाणी संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी नागरिकांशी थेट संवाद साधत असून, योजनांची अधिकृत आणि सविस्तर माहिती देत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना संबंधित विभागाच्या प्रतिनिधींकडून थेट उत्तरे मिळत असल्याने योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही उपलब्ध होत आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कौशल्य विकास, सहकार, सायबर सुरक्षा यासह विविध विभागांच्या योजना आणि उपक्रमांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

दि. 24 सप्टेंबरपर्यंत अभियान

‘लोकसंवाद-2026 हा उपक्रम दि. 24 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभागी होऊन शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *