थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, पाणीटंचाई निवारणाची कामे करावीत – जिल्हाधिकारी आशिष येरेकर 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, पाणीटंचाई निवारणाची कामे करावीत – जिल्हाधिकारी आशिष येरेकर 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

अमरावती, दि. २ (जिमाका) : यंदाच्या मान्सूनचा कालावधी संपला असून यापुढे पावसाची शक्यता नाही. येत्या काळात पाणीटंचाईचे स्वरूप जाणवणार आहे. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी जलसंधारण आणि पाणीटंचाई निवारणाच्या कामांवर सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात तालुका दुष्काळ निवारण व व्यवस्थापन आराखडा कार्यशाळा आज पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपवनसंरक्षक के. अर्जुना उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांची सुमारे नऊ तास विविध विभागांशी चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, तालुकानिहाय दुष्काळाची स्थिती जाणून घेतली. त्यासोबतच जिल्ह्यात उपलब्ध असलेला चारा आणि भविष्यात शासनाच्या प्रयत्नातून चाऱ्याचे उत्पादन वाढविण्याबाबत चर्चा केली. सद्यस्थितीत जिल्ह्यात पुरेसा चारा उपलब्ध आहे. शासनाच्या पुढाकारातून गाळपेर जमीन किंवा शासनाच्या जागा उपलब्ध करून चारा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यासोबतच उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर कमी पाण्यात रब्बीची पिके घेणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गव्हापेक्षा हरभरा, मोहरी आदी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे वळविण्याचे आवाहन त्यांनी केले.

मान्सूनचा कालावधी संपलेला असल्यामुळे जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करता येणे शक्य आहे. ही कामे आतापासूनच सुरू केल्यास येत्या मान्सूनमध्ये अपुरा पाऊस पडला तरी यातून जलपुनर्भरणाची कामे चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वयाने कामे करून जलसंधारणाच्या कामाला तातडीने सुरुवात करावी.

अल निनो हे वैश्विक संकट आहे. मात्र या संकटाचा सामना संधी म्हणून करण्याचा दृष्टिकोन सर्व विभागांनी करावा. पिके घेण्याच्या पद्धतीत बदल ते जैविक शेती पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता करावी लागणार आहे. त्यासोबतच जलसंधारणाची कामे करताना शेततळे, गाळमुक्त धरण ही कामे तातडीने सुरू करावी. शासनाच्या एकत्रित प्रयत्नामुळे दुष्काळाची झळ कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे श्री. येरेकर यांनी यावेळी सांगितले.

०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.