थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

नागपूर स्पोर्ट्स हबच्या विकासाला गती – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर स्पोर्ट्स हबच्या विकासाला गती – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. १८ : नागपूर येथील मानकापूरस्थित विभागीय क्रीडा संकुलातील ‘नागपूर स्पोर्ट्स हब’सह विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज पार पडली.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त राजेश खवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, क्रीडा उपसंचालक महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी शशीकांत कळंबे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, सुनिता रावते, वास्तुविशारद ट्रान्सस्टेडियाचे संबंधित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री बावनकुळे यांनी ‘नागपूर स्पोर्ट्स हब’ प्रकल्पाच्या प्रगतीचा व विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधांच्या अद्यावतीकरणाचा यावेळी आढावा घेतला. नागपूर स्पोर्ट्स हब हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. क्रीडा क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी आहे. यामुळे नागपूर स्पोर्ट्स हबचे बांधकाम भविष्यकालीन योजना लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करून करण्यात यावे. येथे कोराडीच्या धर्तीवर उच्च दर्जाचे पथदिवे लावण्यात यावेत. येथे सौर ऊर्जा प्रणालीचा सर्वत्र वापर करण्यात यावा. बांधकाम करताना सुरक्षितेच्या दृष्टीने संवेदनशील राहा, अशा सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या.

‘नागपूर स्पोर्ट्स हब’ अंतर्गत नव्याने निर्माण होत असलेल्या ११ प्रेक्षागृहांच्या कामाची सरासरी प्रगती ४४ टक्के झाली असून, यामध्ये स्पोर्ट्स कॅफेटेरियाचे काम सर्वाधिक म्हणजेच ८० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऑलिंपिक साईझ जलतरण तलाव मिर्था पूल प्रणालीचा वापर करून उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पात जुनी झाडे वाचवण्यासाठी इमारतींच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे, पालकमंत्री बावनकुळे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही., सोलर सिस्टीम आणि ग्रीहा प्रमाणीकरणाच्या निकषांमुळे सुधारित प्रकल्प किंमत ११४४.३६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बैठकीदरम्यान मानकापूर येथील जुन्या इनडोअर हॉलची दुरुस्ती, वुडन फ्लोअरिंग, वातानुकूलन व अग्निशामक यंत्रणा तसेच ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक व पॅव्हेलियन इमारतीचे अद्यावतीकरण करण्यासाठी ९१.८८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय राज्य शासनाच्या ‘मिशन लक्षवेध’ योजनेअंतर्गत संकुलात सुरू असलेल्या विभागीय निपुणता केंद्र व स्पोर्ट्स सायन्स सेंटरला कार्योत्तर मान्यता देण्यासोबतच बॅडमिंटन खेळाचे राज्यस्तरीय उच्चस्तर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. संकुल परिसरातील ‘युवा वसतीगृह’ आवश्यक सुविधा उपलब्ध करून लवकरच युवकांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *