थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

बीडचा सर्वांगीण विकास साधणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीडचा सर्वांगीण विकास साधणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड, दि. १७ (जिमाका): मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज बीड येथे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले. मराठवाड्याच्या लढ्यात बीड आणि अंबेजोगाईचा मोठा वाटा राहिला असून, या ऐतिहासिक भूमीचा चेहरामोहरा बदलून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या शासकीय कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. तसेच उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी व्यासपीठावर आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इतिहासाचे स्मरण आणि हुतात्म्यांना अभिवादन

ध्वजारोहणानंतर संबोधित करताना पालकमंत्री श्रीमती पवार यांनी राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने मुक्तीसंग्रामातील हुतात्मा वीरांना व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. हा लढा केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यात तेलंगणा व कर्नाटक मुक्तीसाठी योगदान देणाऱ्या वीरांचाही सहभाग होता, असे सांगत त्यांनी त्यांनाही वंदन केले. आजच्या या मंगलदिनी गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणाचे पर्व सुरू असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने बीडकरांच्या वतीने त्यांनी प्रधानमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल १३ महिने २ दिवसांनी, म्हणजेच १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला. या स्वातंत्र्यासाठी जनतेला सशस्त्र लढा द्यावा लागला व रक्त सांडावे लागले. आपले वडील दिवंगत बाजीराव पाटील हे स्वतः या संग्रामात मुक्तिसैनिक म्हणून सहभागी झाले होते, हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा वारसा असल्याचे सांगताना त्या भावुक झाल्या.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील या लढ्याचा बीड व अंबेजोगाई हा केंद्रबिंदू होता. हा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नसून शिक्षण, स्वाभिमान व लोकशाही मूल्यांसाठी होता, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी विठ्ठलराव काटकर यांचा गनिमी कावा, डॉ. ताराबाई परांजपे, कॉम्रेड करुणा चौधरी, प्रमिला कुलकर्णी, प्रतिभाताई वैशंपायन यांचे योगदान, रझाकारांविरुद्ध शहीद झालेल्या गोदावरीबाई टेके आणि पुरुषवेशात लढणाऱ्या दगडाबाई शेळके यांच्या अतुलनीय शौर्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. धारूरचे हुतात्मा काशिनाथ बच्चाळकर, बीडचे हुतात्मा वसंत राक्षसभुवनकर यांच्यासह जिल्ह्यातील २२ हुतात्म्यांच्या बलिदानाचे व पुरुषोत्तमराव चपळगावकर, रामभाऊ स्वामी आणि काशिनाथराव जाधव यांच्या नेतृत्वाचेही त्यांनी स्मरण केले. हा इतिहास केवळ स्मरण करण्यापुरता नसून पुढील पिढीला प्रेरणा देणारा असल्याचे त्या म्हणाल्या.

पायाभूत सुविधा, सांस्कृतिक व क्रीडा प्रकल्पांना गती

बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या अनेक प्रकल्पांची माहिती पालकमंत्र्यांनी दिली:

रेल्वे सेवा – गतवर्षी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड-अहिल्यानगर रेल्वेचे उद्घाटन करताना बीडकरांना पुण्याला रेल्वेने जाण्याचे वचन दिले होते. ते वचन पूर्ण करत आज पुण्याला जाणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

सांस्कृतिक विकास –  यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे नूतनीकरण आणि मुलांना विज्ञानाची ओळख करून देणाऱ्या अत्याधुनिक तारांगणाचे आज भूमिपूजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र व शिक्षण – परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ३०१ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच, परळीत ५६५ कोटी रुपये खर्चून ४१ हेक्टरवर उभारलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे गेल्याच महिन्यात उद्घाटन झाले आहे.

क्रीडा क्षेत्र – क्रीडा संकुलाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, ऑलिम्पिक पदकविजेते स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यंदा बीडमध्ये होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

कृषी, आरोग्य आणि कल्याणकारी योजनांचा आढावा

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला

शेती व सिंचन – अल-निनोमुळे पावसाची स्थिती समाधानकारक नसली तरी प्रशासनाला आवश्यक पाहणीच्या सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे ६७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४९१ कोटी रुपये जमा करून सातबारा कोरा करण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ४०० गावांची निवड झाली आहे. तर आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध होऊन २६ गावांतील ८,१४७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

रोजगार व निधी – २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यात जवळपास १४,७६५ कामांतून सुमारे दीड कोटी मनुष्यदिवस रोजगार निर्माण झाला असून, यंदा ६२३ कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन निधी उपलब्ध झाला आहे. ‘महाराजस्व समाधान शिबिरां’मधून १ लाख ४० हजारांहून अधिक नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे.

आरोग्य व सामाजिक न्याय- आरोग्य क्षेत्रात मोतीबिंदू शस्त्रक्रियांमध्ये १६० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. ‘मिशन साथी’अंतर्गत ऊसतोड कामगारांना आरोग्य सुविधा व आयुष्मान कार्ड दिली जात आहेत. त्यांच्या मुलांसाठी राज्यातील पहिले ‘संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह’ गेल्या महिन्यात सुरू करण्यात आले.

लाडकी लेक व कुणबी प्रमाणपत्र – ‘लेक लाडकी’ योजनेतून साडेसात हजारांहून अधिक लाभार्थींना आर्थिक मदत मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ११ हजारांपेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले असून हैदराबाद गॅझेटवर आधारित ५५४ अर्जांवर १०० टक्के कारवाई पूर्ण झाली आहे.

बीड जिल्हा विकासाच्या नव्या वाटेवर असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्यासाठी सर्व बीडकरांनी खंबीर साथ द्यावी, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *