थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
गुरूवार, १ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

ठळक घडामोडी

महात्मा गांधी : वन मॅन आर्मी 

महात्मा गांधी : वन मॅन आर्मी 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

महात्मा गांधींचे नाव घेतले की, आपल्या डोळ्यांसमोर हातात काठी घेतलेला, पंचा नेसलेला, कृश देहयष्टीचा आणि चेहऱ्यावर विलक्षण शांत हास्य असलेला एक माणूस उभा राहतो. त्यांच्याकडे ना बंदूक होती, ना सैन्यदल; ना सत्ता होती, ना राज्ययंत्रणा. तरीही विसाव्या शतकातील सर्वांत शक्तिशाली साम्राज्याला आव्हान देणाऱ्या या माणसाला इतिहासाने असामान्य नैतिक शक्तीचा नेता म्हणून स्थान दिले. म्हणूनच महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले, तर त्यांना तत्कालीन व्यवस्थेत ‘वन मॅन आर्मी’ असे म्हणण्यामागचा अर्थ लक्षात येतो.

२ ऑक्टोबर गांधी जयंतीला या महामानवाला अभिवादन करताना निद्रिस्त देशाला त्याच्या हक्काची जाणीव निर्माण करून संघर्ष करायला उभे करणाऱ्या या चेतनापुरुषापुढे प्रत्येक भारतीयाने आदराने नतमस्तक होणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मात्र येथे ‘वन मॅन आर्मी’ म्हणजे शस्त्र हातात घेऊन लढणारा एकटा सैनिक नव्हे. उलट, शस्त्राशिवाय हजारो निराधार, नि:शस्त्र, गरीब लोकांमध्ये लढण्याचे बळ निर्माण करणारा महापुरुष म्हणजे महात्मा गांधी. ज्यांचा कुणी नेता नाही, ज्यांच्या अन्यायाला वाचा नाही, ज्यांच्याकडे कोणतेही साधन-साहित्य-सामग्री नाही, अशा समुदायाला संघर्ष करण्याची शक्ती निर्माण करणारा एक माणूस, असा त्याचा अर्थ आहे.

कारण गांधीजींची सेना होती सत्याची; त्यांचे शस्त्र होते अहिंसा; त्यांची ढाल होती करुणा,त्यांची ताकद होती संयम आणि त्यांचे सर्वांत मोठे सामर्थ्य होते माणसाच्या अंतःकरणावरील विश्वास. या एका महामानवाने अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये सर्व जाती धर्म गुण्यागोविंदाने नांदतील अशा भारताची स्वप्ने बघितली होती. नव्हे त्याची बीजे स्वतःच्या जीवनशैलीतून पेरली होती. आज भारत त्यांनी पेरलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर उभा राहिला आहे. एका माणसाने आपल्या समर्थकांच्या, अनुयायांच्या हजारो हातांनी हा देश उभा केला. म्हणून गांधी वन मॅन आर्मी आहेत.

गांधींना ‘महात्मा’ ही उपाधी कोणी दिली

रवींद्रनाथ टागोर यांनी १९१५ मध्ये गांधींना ‘महात्मा’ म्हटले. गांधी स्मृतीच्या माहितीनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ४ जून १९४४ रोजी आझाद हिंद रेडिओवरून गांधींना ‘Father of the Nation’ म्हणून संबोधले. राष्ट्रपिता म्हटले. परंतु ‘One-Man Boundary Force’ हा उल्लेख या लेखाच्या शीर्षकाशी अधिक जवळचा आहे. भारताच्या फाळणीच्या काळात एकीकडे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात असूनही हिंसा सुरू होती. त्याच वेळी दुसरीकडे  गांधीजी कलकत्त्यात हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी काम करीत होते. २६ ऑगस्ट १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात पंजाबमधील ५५ हजार सैनिकांचा संदर्भ देत बंगालमध्ये ‘one-man’ अशी एक आपली शक्ती असल्याचे नमूद केले. त्यांचा इशारा गांधीजींकडे होता. त्यांच्या बंगाल प्रांतातील एकट्या लढ्याकडे होता. गांधीजींना “One-Man Boundary Force” म्हणून त्यांनी त्या विदारक परिस्थितीत आदरांजली अर्पण केली. त्यामुळे ही उपमा का महत्त्वाची आहे, हे कलकत्त्याच्या घटनांमधून समजते.

१९४७ च्या ऑगस्टमध्ये कलकत्ता सांप्रदायिक हिंसेच्या छायेत होता. गांधीजींनी सुरक्षित जागा शोधण्याऐवजी हिंसाग्रस्त भागात जाण्याचा निर्णय घेतला. १३ ऑगस्टला ते हुसैन शहीद सुहरावर्दी यांच्यासह बेलियाघाटा येथील हैदरी मॅन्शनमध्ये राहायला गेले. हा परिसर त्या वेळी तणावग्रस्त होता. गांधींच्या प्रार्थना, संवाद आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाण्याच्या प्रयत्नांचा तेथील हिंसेवर परिणाम झाला. ‘गांधी हेरिटेज पोर्टल ‘ या कालखंडाला कलकत्त्यातील ‘Miracle of Calcutta’ म्हणून नोंदवते. इथे गांधीजींच्या ‘वन मॅन आर्मी’चे खरे स्वरूप दिसते. त्यांनी सैन्य उभे केले नाही; त्यांनी माणसाच्या विवेकाला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोधकाला शत्रू मानले नाही. त्याच्या अंतःकरणाला आवाहन केले. त्यामुळे त्यांचा संघर्ष केवळ राजकीय नव्हता; तो माणसाच्या मनावर चालणारा संघर्ष होता.

दक्षिण आफ्रिकेतील पाळेमुळे

 या शक्तीची मुळे दक्षिण आफ्रिकेत सापडतात. १८९३ मध्ये पीटरमार्टिझबर्ग येथे वैध तिकीट असूनही वर्णभेदामुळे गांधींना रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांवरील भेदभावाविरुद्ध त्यांनी संघर्ष उभारला. याच काळात सत्याग्रहाची संकल्पना आकाराला आली. सत्याग्रह म्हणजे केवळ सरकारविरुद्ध आंदोलन नव्हते. गांधींच्या दृष्टीने सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह आणि अन्यायाविरुद्ध अहिंसक प्रतिकार. त्यामध्ये विरोधकाचा विनाश नव्हता; त्याच्या विवेकाला जागवण्याचा प्रयत्न होता. म्हणूनच गांधींची अहिंसा ही निष्क्रियता नव्हती. ती कृतीची, धैर्याची आणि आत्मसंयमाची पद्धत होती.

दांडी मार्च प्रभावी उदाहरण

दांडी मार्च हा त्याचा अत्यंत प्रभावी नमुना. १२ मार्च १९३० रोजी गांधी ७९ सहकाऱ्यांसह साबरमतीहून दांडीकडे निघाले. ब्रिटिश साम्राज्याच्या दृष्टीने क्षुल्लक वाटणाऱ्या मिठाच्या कायद्याला त्यांनी साम्राज्यविरोधी जनआंदोलनाचे प्रतीक बनवले. पुढे हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले. दांडी मार्चने सत्य आणि अहिंसेच्या नैतिक शक्तीला व्यापक जनशक्तीत रूपांतरित केले. म्हणूनच गांधीजींची ‘सेना’ ही संख्येची नव्हती; ती विश्वासाची होती. त्यांच्या एका आवाहनाने सामान्य माणूस मिठाचा कायदा मोडण्यासाठी समुद्राकडे निघाला. त्यांच्या एका आवाहनाने परदेशी वस्त्रांचा त्याग झाला. त्यांच्या एका आवाहनाने लाखो लोक स्वातंत्र्याच्या संघर्षात सहभागी झाले. त्यांनी रायफल किंवा मशीनगनच्या शक्तीऐवजी सामान्य माणसामध्ये असलेल्या नैतिक शक्तीला जागृत केले. याच कारणामुळे गांधीजींचा प्रभाव भारताच्या सीमा ओलांडून गेला.

जगभरात गांधीजींचे अनुयायी

जगामध्ये सर्वाधिक पुतळे विविध देशांत असणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधी. अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला आणि इतर अनेक नेत्यांवर गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला. राष्ट्रपतींच्या संदेशातही गांधींच्या विचारांनी किंग, मंडेला आणि इतर जागतिक नेत्यांना प्रभावित केल्याचे नमूद आहे. गोलमेज परिषदेला जेव्हा गांधीजी लंडनला गेले त्यावेळी ब्रिटनमधील नागरिक त्यांना बघायला रस्त्यांवर गर्दी करत. प्रचार-प्रसाराचा तो काळ नव्हता. आपल्या विरोधकांच्या मनामध्ये देखील त्यांनी या देशाबद्दल आत्मीयता निर्माण करण्याचे काम आपल्या वर्तनातून केले. अल्बर्ट आइनस्टाइन यांनी गांधींबद्दल केलेले प्रसिद्ध विधानही त्यांच्या जागतिक प्रभावाचे द्योतक आहे. “अशा प्रकारचा माणूस प्रत्यक्ष रक्तामांसात या पृथ्वीवर चालत होता, यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणे कठीण जाईल.”

गांधींच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे करुणा. त्यांच्यासाठी अहिंसा केवळ राजकीय तंत्र नव्हते. ती जीवनपद्धती होती. शब्दांतही हिंसा नको, विचारांतही हिंसा नको, विरोधकाबद्दलही द्वेष नको—अशी त्यांची भूमिका होती. विरोधकांमधल्या गुणवानांचीही कदर कशी करावी हे गांधींनी आपल्या पूर्ण आयुष्यात दाखवून दिले. त्यामुळे त्यांचे पक्के विरोधकही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात असायचे.

बिकट परिस्थितीला सामोरे जाणारे व्यक्तिमत्त्व

नोआखली असो, बिहार असो किंवा कलकत्ता—गांधी हिंसेच्या केंद्रात गेले. १९४६-४७ च्या सांप्रदायिक हिंसेच्या काळात ते लोकांमध्ये राहिले, पायी फिरले, प्रार्थना केली, संवाद साधला आणि गरज पडली तेव्हा उपोषण केले. नोआखलीत त्यांचा पदयात्रेचा कालखंड हा त्यांच्या अहिंसक शांतता-प्रयत्नांचा महत्त्वाचा अध्याय आहे. याच ठिकाणी ‘वन मॅन आर्मी’ या शब्दाचा खरा अर्थ स्पष्ट होतो. जगात युद्धे जिंकण्यासाठी सैन्य असतात; पण माणसांच्या मनातील द्वेषावर विजय मिळवण्यासाठी कोणते सैन्य असते? गांधीजींनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या आचरणातून दिले. त्यांनी सांगितले की शत्रूला पराभूत करण्यापेक्षा त्याच्या मनातील शत्रुत्व बदलणे अधिक मोठा विजय आहे.

आज जग पुन्हा हिंसा, युद्ध, द्वेष आणि असहिष्णुतेच्या प्रश्नांशी झुंजत आहे. अशा वेळी गांधीजींचे महत्त्व केवळ इतिहासातील एका स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यापुरते मर्यादित राहत नाही. त्यांची पद्धत आपल्याला वेगळा प्रश्न विचारते—शस्त्रांनी शांतता निर्माण करता येते का, की शांततेसाठी माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी नैतिक शक्ती आवश्यक असते? गांधींचे उत्तर स्पष्ट होते. त्यांनी १९२० मध्ये Young India मध्ये अहिंसेला मानवजातीच्या सर्वांत मोठ्या शक्तींपैकी एक मानले. त्यांच्या दृष्टीने अहिंसा म्हणजे दुर्बलतेचा स्वीकार नव्हता; ती अन्यायाला न झुकता, अन्याय करणाऱ्याविषयीही द्वेष न बाळगता लढण्याची शक्ती होती.

म्हणूनच महात्मा गांधींना ‘वन मॅन आर्मी’ म्हणणे ही शस्त्रबळाची उपमा नाही; ती नैतिक शक्तीची उपमा आहे. एका माणसाने स्वतःभोवती बंदुका जमवल्या नाहीत; त्यांनी माणसे जोडली. त्यांनी सैन्य उभे केले नाही; त्यांनी समाजाच्या विवेकाला जागे केले. त्यांनी हिंसेला हिंसेने उत्तर दिले नाही; त्यांनी सत्य, अहिंसा आणि करुणेला संघर्षाचे सामर्थ्य बनवले.

म्हणूनच माउंटबॅटन यांनी कलकत्त्यातील त्या विलक्षण परिस्थितीत गांधींना ‘One-Man Boundary Force’ म्हटले, ही घटना गांधींच्या जीवनातील केवळ एक प्रशंसात्मक नोंद नाही. ती त्यांच्या नेतृत्वाच्या एका अद्वितीय स्वरूपाची ऐतिहासिक साक्ष आहे. गांधींची सेना माणसांची होती; तिचे शस्त्र सत्य होते, तिची शक्ती अहिंसा होती आणि तिचे अंतिम ध्येय माणुसकी होते. म्हणूनच गांधी केवळ अहिंसेचे पूजारी नव्हते; ते अहिंसेला संघर्षाची शक्ती बनवणारे ‘वन मॅन आर्मी’ होते.

प्रवीण टाके

उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय,

छत्रपती संभाजीनगर

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.