थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, २३ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

महाविस्तार ॲपद्वारे शेतकऱ्यांनी कृषीविषयक माहितीचा लाभ घ्यावा- मंडळ कृषी अधिकारी, मधुकर वर्पे

महाविस्तार ॲपद्वारे शेतकऱ्यांनी कृषीविषयक माहितीचा लाभ घ्यावा- मंडळ कृषी अधिकारी, मधुकर वर्पे

नाशिक, दि. २२ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानासोबत शेतकऱ्यांना वेळोवेळी आवश्यक असलेली कृषीविषयक माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर महत्त्वाचा आहे. महाविस्तार ॲपच्या माध्यमातून कृषीविषयक विविध माहिती व मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. शेतकऱ्यांनी या सुविधेचा वापर करून शासनाच्या कृषी योजना, आधुनिक तंत्रज्ञान व पीकविषयक मार्गदर्शनाची माहिती मिळवावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी, मधुकर वर्पे यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिकच्या वतीने शासकीय योजना, उपक्रम व लोककल्याणकारी कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद २०२६’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत येवला तालुक्यातील नांदेसर येथे जिल्हा माहिती कार्यालय व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी वर्पे मार्गदर्शन करत होते.

कार्यक्रमास सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली कदम, उपसंपादक किरण डोळस, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) राम निंबाळकर, नांदेसर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता जाधव, एम.एस. ग्रुप गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष भरत तनपुरे, शेतकरी शिवम शिंदे, सुभाष मडवी, निसार शेख यांच्यासह महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. वर्पे यांनी महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कृषीविषयक डिजिटल सुविधांची माहिती दिली. कृषी विभागाच्या डिजिटल माध्यमातून हवामानाची माहिती, बाजारभाव, पिकनिहाय कृषी सल्ला तसेच विविध शासकीय योजना व कृषीविषयक मार्गदर्शनाची माहिती उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा नियमित वापर करावा, असे त्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या अधिकृत डिजिटल सेवांमध्ये हवामान अंदाज, एपीएमसी बाजारभाव, पर्जन्यमान माहिती आणि पीक सल्ला यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

यासोबतच त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पोकरा योजना, कृषी स्वावलंबन योजना, शेततळे, सूक्ष्म सिंचन योजना आणि शेतीशाळा यांबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. संबंधित योजनांचे निकष, पात्रता व उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली कदम यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्र, ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध कर्ज योजनांची माहिती दिली.

जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक किरण डोळस यांनी ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाचे स्वरूप व उद्दिष्टे तसेच शासकीय योजना व लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती गावपातळीवर पोहोचविण्याच्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने यावेळी Bappa.org या डिजिटल माध्यमातून गणेशोत्सवाची छायाचित्रे, माहिती व आठवणी संकलित करून गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *