थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या – डॉ. संघमित्रा फुले

मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या – डॉ. संघमित्रा फुले

रत्नागिरी, दि. १९ (जिमाका): बदलत्या जीवनशैलीत निर्माण होणारा मानसिक तणाव, नैराश्य आणि वाढत्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी शासनाची ‘टेली-मानस’ (Tele-MANAS) हेल्पलाइन अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे. १८००-८९-१४४१६ या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधून टेलिमानस सेवेचा लाभ घ्या, असे आवाहन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रादेशिक मनोरुग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात  लोकसंवाद २०२६ कार्यक्रम आज करण्यात आला. यावेळी डॉ. फुले, मानसोपचार तज्ज्ञ हरिणाक्षी गोसावी, आरोग्यमित्र कोमल सावंत उपस्थित होत्या. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकसंवाद विषयक सर्वप्रथम सविस्तर माहिती दिली.

डॉ. फुले म्हणाल्या, सध्याच्या काळात नैराश्य, अपेक्षाभंग, आर्थिक नुकसान, जवळच्या व्यक्तीचा विरह तसेच जीवनातील वाढती स्पर्धा यामुळे विशेषतः १८ ते ३५ वयोगटातील तरुण पिढीमध्ये नैराश्याचे आणि आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. या वयोगटात आत्महत्येचे प्रमाण जवळपास ३५ टक्के इतके असून, हा वयोगट कुटुंबातील महत्त्वाचा कर्ताधर्ता घटक असतो. अशा मानसिक संकटाच्या वेळी मनात आत्महत्येचे किंवा टोकाचे विचार येण्यापूर्वी तातडीने संवाद साधणे गरजेचे असल्याचे आहे. मानसिक आरोग्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणारी ‘टेली-मानस’ ही मोफत आणि चोवीस तास उपलब्ध असणारी समुपदेशन सेवा आहे. ज्या व्यक्तींना खासगी डॉक्टरांकडे जाणे आर्थिक कारणास्तव परवडत नाही किंवा वेळ नसतो, त्यांनी मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या सुविधेचा आवर्जून लाभ घ्यावा.

या सेवेसाठी १४४१६ (14416) किंवा १८००-८९-१४४१६ (1800 89 14416) या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येतो. समाजात मानसिक आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करावी आणि आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकांमध्ये किंवा आजूबाजूला कोणी नैराश्यात असल्यास त्यांना या हेल्पलाइन क्रमांकाविषयी माहिती देऊन संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. फुले यांनी केले.

मानसिक आरोग्य कायदा हा रुग्णांच्या मानवी हक्कांचे रक्षण करणारा: डॉ. हरिणाक्षी गोसावी

मानसिक आरोग्य कायदा २०१७ हा मनोरुग्णांच्या मानवी हक्कांवर आणि त्यांच्या संरक्षणावर आधारलेला (Right-based Act) असून, या कायद्यानुसार स्थापन झालेले ‘मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड’ (MHRB) रुग्णांच्या हितासाठी सक्रियपणे कार्य करत आहे, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिणाक्षी गोसावी यांनी दिली. पूर्वी १९८७ च्या कायद्यानुसार मनोरुग्णांना केवळ समाजापासून वेगळे ठेवणे किंवा डी-इन्स्टिट्युशनलायझेशनवर भर देणे एवढाच दृष्टिकोन असायचा. मात्र, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि औषधोपचार पद्धतीतील बदलांमुळे आता मनोरुग्णांकडे पाहण्याचा समाजाचा आणि प्रशासनाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. मानसिक आरोग्य कायदा २०१७ नुसार रुग्णांना योग्य उपचाराचा हक्क, औषधोपचाराचा अधिकार आणि आपल्या आजाराबाबत माहिती जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार मिळाला आहे.

आसाममधील गरोदर महिलेचे यशस्वी पुनर्वसन

एका यशस्वी कामगिरीची माहिती देताना डॉ. गोसावी यांनी सांगितले, काही महिन्यांपूर्वी एक अनोळखी व गरोदर महिला मनोरुग्ण उपचारासाठी दाखल झाली होती. तिच्या गरोदरपणाची योग्य वैद्यकीय तपासणी, उपचार व संपूर्ण काळजी घेण्यात आली. त्यानंतर विविध MHRB मंडळांच्या समन्वयातून आणि रुग्णालयाच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नाने तिला सुखरूपपणे गुवाहाटी (आसाम) येथील मनोरुग्णालयात पाठवून तिच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात आली. मनोरुग्णालयांमध्ये विविध जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी येत असून प्रशासन त्यांना बरे करण्यासाठी कटिबद्ध आहे. मानसिक आजार बरे होऊ शकतात, त्यामुळे समाजाने याविषयीचे गैरसमज दूर करून उपलब्ध शासकीय आरोग्य सेवांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गोसावी यांनी केले.

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा: आरोग्यमित्र कोमल सावंत

गरजू रुग्णांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनांच्या माध्यमातून पात्र रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ दिला जातो, अशी माहिती आरोग्यमित्र कोमल सावंत यांनी दिली. विविध आजारांच्या उपचारासाठी ही योजना संलग्न रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. ज्या नागरिकांकडे ‘आयुष्मान भारत कार्ड’ उपलब्ध आहे, त्यांना योजनेच्या नियमांनुसार ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. ज्या नागरिकांचे रेशन कार्ड ऑनलाइन नोंदणीकृत आहे, अशा लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड काढून दिले जाते आणि त्यांना योजनेची सविस्तर माहिती देऊन उपचारांचा लाभ मिळवून दिला जातो. पात्र नागरिकांनी या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा.

यावेळी उपचारार्थी, नातेवाईक, गणेशभक्त, नागरिक, कर्मचारी उपस्थित होते.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *