
नाशिक, दि. १६ : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा व विविध कौशल्यांच्या विकासाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकसह राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’ सुरू करण्यात येणार असल्याची असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी यांनी केले.
जिल्हा परिषद नाशिकच्या ‘ज्ञानयात्री’ शैक्षणिक सहल उपक्रमाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधाताना मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्यासह अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मंत्री श्री.भुसे म्हणाले की, ‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण व जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा देण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच उपयोग होणार आहे. जिल्हा परिषद नाशिकच्या ‘ज्ञानयात्री’ उपक्रमातून आतापर्यंत ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचा अनुभव घेतला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील विषयांसोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जिज्ञासा निर्माण व्हावी आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्ञानयात्री’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, इतिहास, संस्कृती यांसह विविध क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडा, विज्ञान, भाषा आणि विविध कौशल्यांच्या क्षेत्रात प्रगती साधावी, यासाठी आवश्यक संधी निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी सांगत या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी निफाड तालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषेतून आपल्या शैक्षणिक सहलीचा अनुभव शिक्षण मंत्री श्री. भुसे यांच्यासमोर कथन केला. डोंगरगाव शाळेतील २० विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषा परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. परकीय भाषा आत्मसात करण्यासोबतच विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, शिक्षक, पालक, प्रशासन आणि समाजातील विविध घटकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले.
000000

Leave a Reply