
बारीपाड्यात वनभाजी स्पर्धा व मिलेट महोत्सव उत्साहात; महिलांचा उल्लेखनीय सहभाग
धुळे, दि. ३० सप्टेंबर : रानभाज्या म्हणजे केवळ जंगलातून मिळणारा आहार नसून आदिवासी समाजाने पिढ्यान्पिढ्या जपलेल्या पारंपरिक ज्ञानाचा, निसर्गाशी असलेल्या नात्याचा आणि आरोग्यदायी जीवनपद्धतीचा अमूल्य ठेवा आहे. हे ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे आयोजित ‘वनभाजी स्पर्धा व मिलेट महोत्सव 2026’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार राजेश पाडवी, आमदार दिलीप बोरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, तहसीलदार साहेबराव सोनवणे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे गिरीश कुबेर, मैत्रबोध परिवाराचे श्रीमित्र जीवजी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील तसेच महोत्सवाचे आयोजक पद्मश्री चैत्राम पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, महिला बचत गट, ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री डॉ. वुईके म्हणाले, रानभाज्या आणि मिलेट्स अर्थात भरडधान्यांना आज जगभरात नव्याने महत्त्व प्राप्त होत आहे. पारंपरिक, नैसर्गिक आणि आरोग्यदायी अन्नपद्धतीकडे जग पुन्हा वळत असताना आदिवासी समाजाकडे हे ज्ञान पूर्वापार आहे. कोणत्या ऋतूत कोणती रानभाजी मिळते, कोणत्या वनस्पतीचा कशासाठी उपयोग होतो, याचे मौलिक ज्ञान वयोवृद्ध, महिला आणि वैदू यांनी आपल्या अनुभवातून जपले आहे.
आदिवासी समाजाची जीवनशैली देव-दैवत, अस्मिता आणि निसर्गाशी घट्ट जोडलेली आहे. आपण निसर्गाकडून भरभरून घेतो; मात्र त्याची परतफेड निसर्गसंवर्धनातून झाली पाहिजे. जल, जमीन आणि जंगल टिकले तरच संस्कृती, जीवनपद्धती आणि पारंपरिक ज्ञान टिकून राहील, असे मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी जनजाती समाजाच्या निसर्गाशी असलेल्या अतूट नात्यावर भर दिला. संस्कृती केवळ उत्सवात साजरी न करता तिच्यामागील मूल्ये आणि ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आयुर्वेद, वनौषधी आणि नैसर्गिक उपचारपद्धती या आदिवासी जीवनशैलीचा अविभाज्य भाग असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
बारीपाड्याच्या उत्पादनांना मूल्यवर्धन व बाजारपेठेची जोड देणार – पालकमंत्री जयकुमार रावल
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले, अनेक वर्षांपासून बारीपाड्यातील वनभाजी महोत्सवाविषयी ऐकत होतो. आज प्रत्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळणे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. बारीपाड्याचा वनभाजी महोत्सव आज महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याने देशपातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पद्मश्री चैत्राम पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत ते म्हणाले, जल, जंगल आणि जमीन यांच्या संवर्धनातून लोकसहभागावर आधारित ग्रामविकास कसा घडविता येतो, हे बारीपाड्याने देशाला दाखवून दिले आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आज जगभर अधोरेखित होत असताना बारीपाड्यातील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपूर्वीच याची जाणीव ठेवून प्रत्यक्ष कृती केली. ज्वारी, बाजरी, नाचणी, कोद्रा यांसारख्या भरडधान्यांचे संवर्धन, मूल्यवर्धन, ब्रँडिंग आणि विपणन करण्याची मोठी संधी या भागात आहे. महिला बचत गटांना या प्रक्रियेत जोडल्यास स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळू शकते, असे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
बारीपाड्याचा हा उपक्रम जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी, महिला बचत गट आणि नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी पुढील वर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. पणन विभागाच्या ‘महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क’ अर्थात ‘मॅग्नेट’ प्रकल्पाच्या माध्यमातून बारीपाडा व परिसरातील भरडधान्ये आणि स्थानिक उत्पादनांच्या प्रक्रिया, मूल्यवर्धन व बाजारपेठेशी जोडणीसाठी सुमारे 5 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची शक्यता तपासली जाईल. आवश्यकतेनुसार एक मोठा प्रकल्प किंवा प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प उभारण्याचा पर्यायही विचारात घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सहभागातून वनभाजी महोत्सवाची व्यापक चळवळ : पद्मश्री चैत्राम पवार
पद्मश्री चैत्राम पवार म्हणाले, बारीपाड्यात गेल्या 21 वर्षांपासून वनभाजी महोत्सवाचे सातत्याने आयोजन होत असून जैवविविधतेचा अमूल्य ठेवा समाजासमोर आणणे आणि पारंपरिक ज्ञानाचे संवर्धन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यंदा जवळपास 73 गावांतील 600 महिलांनी वनभाजी स्पर्धेसाठी नोंदणी केली, तर मिलेट उपक्रमात 17 बचत गटांनी सहभाग घेतला. विविध उपक्रमांसह सुमारे 750 महिलांचा सहभाग नोंदविला गेला असून जवळपास 90 टक्के सहभाग महिलांचा आहे. जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन या पाच घटकांवर शासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास शाश्वत विकासाचा भक्कम पाया उभारता येईल. आदिवासी महिलांकडे असलेल्या पारंपरिक ज्ञानाच्या जतनासाठी सुरू झालेला हा छोटासा उपक्रम आज व्यापक चळवळ बनला आहे. सामुदायिक वनहक्क, जैवविविधता आणि पेसा कायद्याचा प्रभावी वापर करून स्थानिक पातळीवर समाजाचे अनेक प्रश्न सोडविता येऊ शकतात. तसेच पर्यावरण शिक्षणाशी या उपक्रमाची सांगड घालून शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय मिशन मोडमध्ये पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वनभाजी स्पर्धेतील विजेते
वनभाजी वैयक्तिक स्पर्धेत ताराबाई कांबडे यांनी 237 भाज्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. राधिकाबाई चौरे 214 भाज्यांसह द्वितीय, नीता चौरे 170 भाज्यांसह तृतीय, विमल पवार 80 भाज्यांसह चतुर्थ, तर संगीता गांगुर्डे यांनी 50 भाज्यांसह पाचवा क्रमांक मिळविला.
मिलेट स्पर्धेतील विजेते
मिलेट स्पर्धेत नंदनवन महिला बचत गटाने नागलीचे 105 प्रकार सादर करून प्रथम, देवमोगरा महिला बचत गटाने सावा या भरडधान्याचे 75 प्रकार सादर करून द्वितीय, तर वैष्णवी महिला बचत गटाने राजगिऱ्याचे 60 प्रकार सादर करून तृतीय क्रमांक मिळविला.
पारंपरिक भात स्पर्धेचे विजेते
पारंपरिक भाताच्या प्रकारांच्या स्पर्धेत सागर महिला बचत गटाने चिम साळ तांदळाचे 70 प्रकार सादर करून प्रथम, साई महिला बचत गटाने काळ्या भाताचे 66 प्रकार सादर करून द्वितीय, तर भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाने पांढऱ्या भवाड्या भाताचे 57 प्रकार सादर करून तृतीय क्रमांक पटकाविला.
बारीपाड्यातील या महोत्सवाने केवळ रानभाज्यांची स्पर्धा न घडविता जैवविविधता, आदिवासी खाद्यसंस्कृती, महिलांचे पारंपरिक ज्ञान, भरडधान्ये आणि लोकसहभागावर आधारित शाश्वत विकासाचा उत्सव साकारला. निसर्गाचे जतन करत स्थानिक उत्पादनांना मूल्यवर्धन आणि बाजारपेठेची जोड दिल्यास आदिवासी भागातील विकासाला नवी दिशा मिळू शकते, हा संदेश या महोत्सवातून अधोरेखित झाला.
००००
