थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत भंडार्ली येथे बँक योजना व सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत भंडार्ली येथे बँक योजना व सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

ठाणे, दि. २४: गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वाच्या निमित्ताने धार्मिक भक्तीसोबतच समाजप्रबोधनाची परंपरा जपत, कल्याण तालुक्यातील भंडार्ली येथे भाविक आणि ग्रामस्थांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत कार्यरत ठाणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित ‘लोकसंवाद’ या अभिनव उपक्रमांतर्गत ‘एक गाव एक गणपती’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भंडार्ली येथे ठाणे जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा योजना आणि डिजिटल व्यवहारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

उत्सव मंडपाच्या माध्यमातून थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून शासकीय योजनांची माहिती देण्याच्या विविध प्रशासकीय विभागांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. उपस्थित भाविक आणि नागरिकांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमांतर्गत आर्थिक साक्षरता या समाजोपयोगी विषयाची मांडणी करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. अभिषेक पवार यांनी विशेष पुढाकार घेतला. गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या आणि मंगलमय वातावरणातील ठिकाणी केवळ औपचारिकता न ठेवता सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांचा संकल्प या आयोजनातून दिसून आला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी बँकेच्या नियंत्रणाखालील आर्थिक साक्षरता केंद्राच्या आर्थिक साक्षरता प्रशिक्षक सौ. शांता शिंदे यांनी उपस्थितांना अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनादरम्यान सौ. शिंदे यांनी केंद्र व राज्य शासनामार्फत बँकांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कर्जयोजना, स्वयंरोजगारासाठी मिळणारे अर्थसहाय्य आणि नियमित बचतीचे महत्त्व विशद केले. प्रत्येकाच्या सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांवर भर देत त्यांनी ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (PMJJBY), ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY), वृद्धापकाळातील आर्थिक आधारासाठी ‘अटल पेन्शन योजना’ (APY) आणि सर्वसमावेशक ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ (PMJDY) यांची सविस्तर माहिती दिली. तसेच नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जागरूक राहण्याचा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला. डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, डिजिटल फसवणूक (Digital Fraud) टाळण्यासाठीचे उपाय, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे तसेच ओटीपी कोणाशीही शेअर न करणे याबाबत सविस्तर प्रबोधन करण्यात आले. फसवणूक झाल्यास त्वरित मदत मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनच्या टोल-फ्री क्रमांकाचा वापर कसा करावा, तसेच बँकिंग सेवेसंदर्भात काही तक्रार किंवा अडचण असल्यास रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल योजनेअंतर्गत (RBI Ombudsman Scheme) रीतसर तक्रार कशी नोंदवावी, याचेही सविस्तर मार्गदर्शन ग्रामस्थांना करण्यात आले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा अग्रणी बँक आणि ग्रामीण बँक व्यवस्थापनाने एकत्र येऊन दाखवलेले हे प्रशासकीय ‘टीमवर्क’ आणि ‘लोकसंवाद’ची संकल्पना भंडार्ली येथील ग्रामस्थांसाठी अत्यंत दिशादर्शक ठरली. बँकेमध्ये जाऊनही ज्या योजनांची संपूर्ण माहिती मिळणे शक्य होत नाही, ती माहिती बँक अधिकाऱ्यांनी बाप्पाच्या मंडपात येऊन थेट दिल्याने भंडार्ली परिसरातील भाविक, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *