
बुलढाणा, दि. २४ : गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना यंदा केवळ आशीर्वादच नव्हे, तर शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहितीही मिळाली. ‘गणरायाचे दर्शन आणि योजनांची माहिती’ या अभिनव संकल्पनेतून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाला शेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने मंडळांच्या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत आहेत. या संधीचा उपयोग करून शासनाच्या योजना, सुविधा आणि विविध लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालयाने हाती घेतला आहे.
शेगाव येथील कार्यक्रमात कृषी, महिला व बालविकास, आरोग्य तसेच महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपलब्ध सुविधा आणि योजनांचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महिला व बालविकास पर्यवेक्षक शुभांगी जाधव यांनी महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे, शासनाच्या विविध योजना तसेच उपलब्ध सुविधांची माहिती दिली. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत जोशी यांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व समुपदेशन केले.
नायब तहसीलदार विजय सुरडकर व ऋतुजा पारखे यांनी महसूल विभागाच्या विविध लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया आणि संबंधित विभागाशी संपर्क साधण्याची पद्धत याबाबतही नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
गणेश मंडळाचा परिसर केवळ धार्मिक उत्सवाचे केंद्र न राहता शासनाच्या योजनांची माहिती मिळविण्याचे व्यासपीठ ठरल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. विशेषतः शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी विविध योजनांबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. गावपातळीवरच शासनाच्या योजनांची माहिती उपलब्ध झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
‘योजना समजून घ्या, पात्रतेनुसार लाभ घ्या’ या उद्देशाने सर्व पात्र नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी धनंजय देशमुख, महिला व बालविकास पर्यवेक्षक शुभांगी जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत जोशी, नायब तहसीलदार विजय सुरडकर, ऋतुजा पारखे, ह.भ.प. संतोष महाराज वसतकार, लोकमतचे तालुका प्रतिनिधी अनिलभाऊ उंबरकर, दैनिक दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार धनराज ससाणे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महेंद्र मिश्रा, मंडळाचे अध्यक्ष वरुण नागपाल, संस्थापक सदस्य कमलाकर चव्हाण, जिल्हा माहिती कार्यालयाचे जयंत वानखडे, उप माहिती कार्यालयाचे ललितकुमार ढोकणे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
00000

Leave a Reply