
सोलापूर/अक्कलकोट, दि. 25 (जिमाका) : लोकसंवाद 2026 या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अक्कलकोट येथील राजे फत्तेसिंह चौक गणेश मंडळाच्या पदाधिकारी व गणेशभक्तांना पाणी संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जीवनासाठी पाण्याचे महत्त्व तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संवर्धन व संगोपन करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालयाचे सर्वसाधारण सहाय्यक संजय घोडके यांनी लोकसंवाद 2026 उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, उपक्रम आणि जनजागृतीपर संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाच्या उपक्रमांचे छायाचित्रे, व्हिडिओ, रील्स आणि कथा ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (Bappa.org) या संकेतस्थळावर अपलोड करून गणेशोत्सवाचे दस्तावेजीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.
राजे फत्तेसिंह चौक गणेश मंडळाची स्थापना संस्थान काळापासून झाल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. मंडळाच्या माध्यमातून बेघर व गरजू व्यक्तींना अन्नदान तसेच जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचे सामाजिक कार्य केले जाते. मंडळाचे अध्यक्ष रोहित निंबाळकर, उपाध्यक्ष बाबू शाह, खजिनदार आकाश गंगणे, मिरवणूक प्रमुख आनंद फडतरे तसेच महेश ग्राम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply