
सांगली, दि. २३ (जि. मा. का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने लोकसंवाद उपक्रमांतर्गत आष्टा आणि कसबे डिग्रज येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून प्रबोधन करण्यात आले. आष्टा येथील छत्रपती शिवाजी गणेश तरूण मंडळ आणि शंभुराजे गणेश मंडळ (धनगर गल्ली) येथे तसेच कसबे डिग्रज येथील शिवनेरी मित्र मंडळ येथे आयोजित या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंचावर जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, कौशल्य विकास विभागाचे संतोष फासे, बार्टीच्या संयोगिता हेरकळ, आष्ट्याचे महसूल सहाय्यक रवींद्र साळुंखे, कोतवाल सुधीर गोंधळी यांनी त्यांच्या विभागाच्या महत्त्वाच्या चालू योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. महिलांची सुरक्षितता, रोजगार मिळवण्यासाठीचे उपलब्ध व्यासपीठ, विविध महामंडळे, जात पडताळणी आदिंची माहिती देण्यात आली. याचबरोबर नागरिकांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

कार्यक्रमास कसबे डिग्रजचे योगेश सायमोते, छत्रपती शिवाजी गणेश तरूण मंडळ, आष्टाचे अध्यक्ष संजय जाधव व पदाधिकारी, शंभुराजे गणेश मंडळ, आष्टाचे अध्यक्ष दत्तात्रय कोळेकर व पदाधिकारी आणि शिवनेरी मित्र मंडळ कसबे डिग्रजचे पदाधिकारी, सेतूचालक नितीन खोत व सचिन थोरात आदि उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, महिला, गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी आष्ट्याचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे, सांगलीच्या अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) इनुजा शेख, सहायक आयुक्त (समाजकल्याण) बाळासाहेब कामत, बार्टीचे गणेश सवाखंडे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply