थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, २० सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लोकसंवाद 2026′ अंतर्गत नागराज गणेशोत्सव मंडळात महिला सबलीकरण व शैक्षणिक योजनांवर मार्गदर्शन

‘लोकसंवाद 2026′ अंतर्गत नागराज गणेशोत्सव मंडळात महिला सबलीकरण व शैक्षणिक योजनांवर मार्गदर्शन

सोलापूर, दि. २०: माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद २०२६’ या उपक्रमांतर्गत मोहोळ येथील नागराज गणेशोत्सव सेवाभावी मंडळात महिला सबलीकरण, शैक्षणिक धोरण तसेच विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सवलतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मंडळाचे प्राध्यापक मदन सोनवणे यांनी महिला सबलीकरणाचे महत्त्व, महिलांसाठी शासनाच्या विविध योजना तसेच शैक्षणिक क्षेत्रातील शासनाच्या धोरणांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, शिष्यवृत्ती, शैक्षणिक सवलती आणि इतर सुविधांचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींची माहिती घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद २०२६’ या उपक्रमाचा उद्देश उपस्थित गणेशभक्त, नागरिक व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगण्यात आला. शासनाच्या विविध योजना, उपक्रम व जनकल्याणकारी सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी गणेशोत्सवासारख्या लोकसहभागाच्या माध्यमाचा उपयोग करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.तसेच ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या संकेतस्थळाची माहिती देऊन गणेशोत्सवाचे डिजिटलायझेशन करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणपती साजरा करणाऱ्या नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवातील फोटो, व्हिडिओ, कथा, सामाजिक उपक्रम, देखावे व जनजागृतीपर उपक्रमांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी, असे सांगण्यात आले. यामुळे गणेशोत्सवातील सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांना डिजिटल माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.

यावेळी नागराज गणेशोत्सव सेवाभावी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण सोनवणे, उपाध्यक्ष रामकृष्ण चोरमले, प्राध्यापक मदन सोनवणे, सचिव बबन शिंदे, मुस्तफा शेख, सोफियान शेख, नारायण शिंदे, रामचंद्र कटके यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व गणेशभक्त उपस्थित होते.

‘लोकसंवाद २०२६’ माध्यमातून शासनाच्या योजना आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासोबतच लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांनी तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांनी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ उपक्रमात सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *