थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, २३ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर, दि.२३: सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या सुमारे ५० टक्के असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन व उडीद पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे पावसाअभावी नुकसान झालेल्या सोयाबीन व उडीद पिकांची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे,  देवेंद्र कोठे, राजू खरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार दिलीप माने, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

पंचनाम्याची कार्यवाही नियमानुसार; सरसकट मदतीसाठी प्रयत्न

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे नियमानुसार करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. मदत देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. शासनाची मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात सुमारे १३० दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध

पिकांचे नुकसान झाले असले तरी जिल्ह्यात जवळपास १३० दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ज्या भागात चाऱ्याची कमतरता आहे, त्या भागात इतर ठिकाणांहून चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व भागांत चारा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. आवश्यकता भासल्यास चारा छावण्या सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उजनीचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार

जिल्ह्यातील अनेक लहान व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. उजनी धरणात सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता, जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे.

उजनी धरणातील गाळ काढण्याच्या कार्यवाहीला गती

उजनी धरणातील गाळ काढण्याबाबतही शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. राज्यातील मोठ्या धरणांमधील गाळ काढण्याच्या धोरणांतर्गत उजनी धरणाचाही समावेश आहे. यामुळे भविष्यात धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून, गाळाचा उपयोग शेतीसाठी होऊ शकतो. राज्य शासनाने उजनीसह पाच मोठ्या धरणांमधील गाळ काढण्यासंदर्भातील सुधारित धोरणास मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जिल्ह्यातील पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता, चारा व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत वेळेत मिळावी आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर करून पाणी व चाऱ्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *