
सोलापूर/अक्कलकोट, दि. 25 (जिमाका) : ‘लोकसंवाद 2026 उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने श्री शिवबालाजी तरुण मंडळ, अक्कलकोट येथे गणेशभक्त व नागरिकांना महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद 2026 उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विविध सामाजिक विषयांबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. तसेच गणेश मंडळे आणि नागरिकांनी गणेशोत्सवातील उपक्रमांचे छायाचित्रे, व्हिडिओ, रील्स व कथा ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर अपलोड करून गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तावेजीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.
सायबर व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांची पडताळणी केल्याशिवाय त्यावर कृती करू नये, याबाबत नागरिकांना सावध करण्यात आले. महिलांनी तसेच पालकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
श्री शिवबालाजी तरुण मंडळाची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा
श्री शिवबालाजी तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीवर विशेष भर देण्यात येतो. मंडळाचे लेझीम पथक हेही उत्सवाचे वैशिष्ट्य असून, २०११ पासून लेझीम पथकाला पुरस्कार मिळत असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष अनिल पडनुरे, उपाध्यक्ष राज वांद्रे, खजिनदार राकेश पडनुरे, सचिव अथर्व पडनुरे असून मार्गदर्शक म्हणून संतोष भंडारे, संजय पडनुरे, धनराज भंडारे, दिगंबर कुलकर्णी, आदर्श पडनुरे व समर्थ भंडारे कार्यरत आहेत.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचे उपक्रम राबविण्यासोबतच नागरिकांनी सुरक्षित डिजिटल व्यवहार करावेत आणि महिला सुरक्षेबाबत जागरूक राहावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा माहिती कार्याचे सर्व साधारण सहाय्यक संजय घोडके, वाहन चालक तथा फोटोग्राफर भाऊसाहेब चोरमले यांनी परिश्रम घेतले.
०००००

Leave a Reply