
ठाणे,दि.१८ : नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘सेवा संकल्प’ अभियान प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज कोकण भवन येथे दिले. या बैठकीला विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल,अतिरिक्त विभागीय आयुक्त सिद्धाराम सालीमठ, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर आयुक्त वैशाली इंदानी उंटवाल आणि उपायुक्त रवींद्र पवार हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर मुंबई शहर, पालघर व रायगडचे जिल्हाधिकारी, ठाणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी तसेच विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
श्री.खारगे म्हणाले, महसूल विभागाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यावर भर द्यावा. प्रत्येक आठवड्याला महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
‘महाराजस्व अभियान’ प्रभावीपणे राबवा
नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ प्रभावीपणे सुरू करावे, असे निर्देश अपर मुख्य सचिवांनी दिले. या अभियानाची विभागीय आणि जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या समस्या व अडचणींचे तातडीने निराकरण करावे. महसूल विभागाकडून देण्यात येणारी विविध प्रमाणपत्रे, दाखले आणि अन्य नागरिक सेवा वेळेत उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींचा स्थानिक पातळीवरच मार्ग काढावा. नागरिकांना अनावश्यकपणे कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी सेवा वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
“लोकसंवाद” उपक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत थेट पोहोचा”
माहिती व जनसंपर्क विभागाने आयोजित केलेल्या लोकसंवाद कार्यक्रमात सर्व अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. शासनाच्या विविध योजनांची माहिती या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम कार्य करावे, यासाठी विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालक तसेच आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा, असे अपर मुख्य सचिव श्री.खारगे यांनी बैठकीत उपस्थित सर्वांना आवाहन केले.
नागरिक सेवांसाठी विभागीय यंत्रणांमध्ये समन्वय
नागरिकांना आवश्यक असलेल्या आधारकार्डसह इतर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग आणि यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधावा. नागरिकांना आवश्यक सेवा एकाच ठिकाणी किंवा सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे सूचित करून श्री. खारगे यांनी महसूल विभागाच्या कामकाजात नागरिककेंद्री दृष्टिकोन, नियमित आढावा आणि वेळबद्ध कार्यवाही यांना प्राधान्य देऊन ‘सेवा संकल्प’ अभियान यशस्वी करावे, असे आवाहन केले.
00000000

Leave a Reply