
- शेतकऱ्यांना थेट मदत करणार
सोलापूर, दि. २३ (जिमाका): राज्यातील इतर भागांप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांना थेट मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बार्शी तालुक्यातील धानोरे येथे नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, बार्शी चे तहसीलदार एफ.आर. शेख यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे ५० टक्केच पाऊस झाला असून, खरीप हंगामातील जवळपास सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. धानोरेसह बार्शी तालुक्याच्या या परिसरात सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीकडे शासन गांभीर्याने लक्ष देत असून, शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी लवकरच शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल. मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, अन्नधान्य तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार आहे. आगामी काळात रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले, तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उजनी धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबतही शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे. पालकमंत्री गोरे व आमदार राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यात पाणी आणण्यासाठी मांडलेल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक असून, त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, ‘फ्लड डायव्हर्शन’च्या माध्यमातून उजनी धरणात पाणी आणण्याच्या प्रस्तावावरही कार्यवाही सुरू आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेची मंजुरी मिळाली असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या माध्यमातून उजनीत पाणी आणल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांनाही त्याचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांसमोर पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच पुढील हंगामासाठी पाण्याची उपलब्धता यासारखी आव्हाने निर्माण झाली आहेत. या सर्व बाबींचा शासनाकडून सर्वंकष विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद
यावेळी शेतकरी दमयंती गादेकर, संध्या गरड, वंदना गादेकर, राहुल पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर पावसाअभावी झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीबाबत आपल्या व्यथा मांडल्या तसेच शासनाकडून त्वरित मदत मिळावी अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांना धीर दिला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आपल्याला लवकरात लवकर मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
००००

Leave a Reply