थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

गजराज गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत जी-रामजी रोजगार हमी योजनेची माहिती

गजराज गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत जी-रामजी रोजगार हमी योजनेची माहिती

सोलापूर/अक्कलकोट, दि. 25 (जिमाका) : ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध कामांना चालना देणाऱ्या विकसित भारत–जी-रामजी रोजगार हमी योजनेची माहिती पंचायत समिती, अक्कलकोटच्या वतीने ‘लोकसंवाद 2026 उपक्रमांतर्गत गजराज गणेशोत्सव मंडळ, वेताळ चौक येथे देण्यात आली. पंचायत समिती अक्कलकोटचे तांत्रिक अधिकारी सतीश गायकवाड यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.

जी-रामजी योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची हमी देण्याबरोबरच जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, शाश्वत मालमत्ता निर्मिती आणि हवामानाशी संबंधित कामांना महत्त्व देण्यात आले आहे. योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध विकासकामे सुरू असून, मोठ्या संख्येने मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले. योजनेतील उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. नव्या व्यवस्थेत ग्रामीण कुटुंबांसाठी वार्षिक रोजगाराची हमी 125 दिवसांपर्यंत करण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सर्वसाधारण सहाय्यक संजय घोडके यांनी ‘लोकसंवाद 2026 उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम व जनजागृतीपर संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गणेश मंडळे व नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवातील उपक्रमांचे छायाचित्रे, व्हिडिओ, रील्स व कथा ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर अपलोड करून गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तावेजीकरण करण्याचे आवाहन केले.

गजराज गणेशोत्सव मंडळ, वेताळ चौक यंदा 41 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष रवी कोरे, उपाध्यक्ष दौलप्पा डोंगरे, खजिनदार प्रवीण डोके, सचिव स्वामीनाथ लोणारी असून सल्लागार म्हणून अनिल मोरे, बंडू इंगळे, जाकीर तांबोळी, अनिल लोणारी व सुहास सुरवसे कार्यरत आहेत. मंडळाच्या वतीने दरवर्षी स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित विविध देखावे सादर करण्यात येतात. तसेच पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार भाऊसाहेब चोरमले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *