थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

यशनगर भाग-२ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत विविध विषयांवर जनजागृती

यशनगर भाग-२ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत विविध विषयांवर जनजागृती

सोलापूर, दि. २५ (जिमाका) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत यशनगर भाग-२ गणेशोत्सव मंडळ येथे नागरिकांसाठी विविध शासकीय उपक्रम, योजना आणि सामाजिक विषयांबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी पाणी बचत व पाणी संवर्धन, वृक्षलागवड, महिला धोरण, महिला सुरक्षा तसेच सायबर सुरक्षा या विषयांवर उपस्थित गणेशभक्त व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याचा काटकसरीने वापर करणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची सवय अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपलब्ध विविध यंत्रणा व सुविधांची माहिती देतानाच महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा छळाच्या प्रसंगी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर न करणे, तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि जनहिताच्या संदेशांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ‘लोकसंवाद २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत Bappa.org या डिजिटल माध्यमाचीही उपस्थितांना माहिती देण्यात आली. गणेशोत्सव मंडळे व नागरिकांनी या माध्यमाचा उपयोग करून विविध उपक्रमांची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ तसेच जनजागृतीपर उपक्रम अधिक व्यापकपणे पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी यश नगर भाग-२ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यश नागणे, उपाध्यक्ष व्यंकटेश जाधव, कार्याध्यक्ष निरंजन भगत, उत्सवप्रमुख हर्षद वाघमारे, खजिनदार प्रकाश लाटे, सौ. साधना नागणे, सौ. ज्योती जाधव तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, महिला सुरक्षा, डिजिटल सुरक्षितता आणि जनजागृतीचा प्रभावी माध्यम म्हणूनही उपयोगी ठरावा, या उद्देशाने ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *