थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, २६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

शाश्वत स्वच्छतेसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे

शाश्वत स्वच्छतेसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड,दि.१७ (जिमाका): स्वच्छ भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेचा सहभाग पुरेसा नसून, स्वच्छतेची चळवळ लोकचळवळ बनणे आवश्यक आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा-2026’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत’ या यंदाच्या संकल्पनेवर आधारित हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार प्रा.रवींद्र चव्हाण, महापौर कविताताई मुळे, आमदार भीमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

गावागावांत तसेच शहरांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेली अस्वच्छ ठिकाणे शोधून त्यांची स्वच्छता करण्यात यावी. शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. स्वच्छतेची सवय केवळ अभियानाच्या कालावधीपुरती मर्यादित न राहता ती दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे,असे पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यापूर्वी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी स्वयंप्रेरणा निर्माण करून सामूहिक कृतीला बळ देण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येते. यंदाच्या अभियानातून स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासोबतच स्वच्छतेविषयी जबाबदारी आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत सार्वजनिक स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे, सफाई मित्रांचा सन्मान आणि स्वच्छता जनजागृती यांसह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री.सावे यांनी केले.

‘एक दिवस, एक तास, एक साथ’मधून महाश्रमदान

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत 1 ऑक्टोबर रोजी ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमातून स्वच्छतेसाठी महाश्रमदान करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहरातील प्रभाग तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये एक तास श्रमदान करावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *