
परभणी, दि.१७ : सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या विविध योजना व सेवा अधिक प्रभावीपणे राबवून त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा. विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजन करावे, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्हीसीद्वारे घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली.

सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सदर बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयुक्त (आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई) संजय श्रीपतराव काटकर यांच्यासह सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदींसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे आदी उपस्थित होते.
श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, अभियानाच्या कालावधीत आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी शिबीरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिरे तसेच मधुमेह व इतर आजारांच्या तपासण्यासाठी शिबीरे आयोजित करावीत. यासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घ्यावी. दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक योजना व सेवा पोहोचविण्यावर विशेष भर द्यावा. विद्यार्थी व बालकांचीही आरोग्य तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन अभियानातील उपक्रमांचे नियोजन करावे. अभियानातील प्रत्येक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा. तसेच राबविण्यात येणाऱ्या अभियानाचे दररोज नियमित रिपोर्टिंग करावे, असे निर्देश आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.
यावेळी आयुक्त संजय काटकर यांनी सेवा संकल्प अभियानात आरोग्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
००००

Leave a Reply