थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेकसरिया कॉलेज ऑफ योगा एंड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न

कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेकसरिया कॉलेज ऑफ योगा एंड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न

पुणे दि. १८ : आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात तणाव वाढत असताना योग व्यक्तीला संतुलन, जागरूकता आणि एकाग्रता प्रदान करतो. योगामुळे मन, शरीर आणि आत्म्यामध्ये संतुलन साधण्यास मदत होते. योग अधिक संतुलित, जागरूक आणि निरोगी जीवन जगण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, माजी केंद्रीय मंत्री तथा कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, राकेश सेक्सरिया आदी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन म्हणाले, आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योग व्यक्तीला थांबण्याची, विचार करण्याची, श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची आणि स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची संधी देतो. मन आणि शरीरातील संतुलन तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी योग उपयुक्त ठरतो. महर्षी पतंजलींचे सूत्र आजच्या माहितीच्या सततच्या प्रवाहाच्या काळातही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

योगाला आज जागतिक स्तरावर व्यापक मान्यता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर 21जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला. आज विविध देश, संस्कृती आणि नागरिक योगाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

भारताची तरुण लोकसंख्या ही देशाची मोठी ताकद आहे. तरुणांच्या ऊर्जा, कौशल्य आणि आकांक्षांना शिस्त व जागरूकतेची जोड मिळाल्यास त्यांची क्षमता अधिक प्रभावीपणे विकसित होऊ शकते. योग या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

गोर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या योग शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा उल्लेख करून उपराष्ट्रपती श्री. राधाकृष्णन म्हणाले, स्वामी कुवलयानंद यांनी 1924 मध्ये योगाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी कैवल्यधामची स्थापना केली. त्या काळात योगाच्या शास्त्रीय अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवली. योगाच्या या समृद्ध वारशाचे जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आजच्या संस्थांची आहे, असे त्यांनी नमूद केले.

योगाची वैज्ञानिकता आणि मूळ तत्त्वज्ञान जपणे आवश्यक-राज्यपाल जिष्णु देव वर्मा

योगाची जागतिक स्तरावर वाढती लोकप्रियता लक्षात घेता, भारताने योगाचे मूलभूत ज्ञान, वैज्ञानिकता आणि त्याच्या मूळ तत्त्वज्ञानाशी असलेले नाते जपणे आवश्यक आहे. योगाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन आणि सर्वांगीण आरोग्याला चालना मिळू शकते, असे ते म्हणाले.

श्री. वर्मा म्हणाले, कैवल्यधाम योग संस्था ही भारताचा अभिमान आहे. जवळपास शंभर वर्षांपूर्वी स्वामी कुवलयानंद यांनी वैज्ञानिक संशोधन, शिक्षण आणि आचरणाच्या माध्यमातून योगाचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. आज कैवल्यधामने योग आणि भारतीय संस्कृतीच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. गोर्धनदास सेक्सरिया कॉलेजचा अमृत महोत्सव हा केवळ एका संस्थेच्या 75 वर्षांच्या वाटचालीचा उत्सव नसून, भारताच्या महान ज्ञानपरंपरेचे 75 वर्षे जतन आणि प्रसारण केल्याचा उत्सव आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कैवल्यधामसारख्या संस्थांनी प्रशिक्षित योग शिक्षक, प्रशिक्षक आणि संशोधक घडवावेत. आधुनिक जगाशी प्रभावीपणे संवाद साधताना योगाची शुद्धता आणि अस्सलपणा जपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या संस्थांवर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कैवल्यधामने पुढील काळातही योगाचे अभ्यासक, शिक्षक आणि दूतांची नवी पिढी घडवून ही भारतीय ज्ञानपरंपरा देशाच्या प्रत्येक भागात तसेच जगभर पोहोचवावी, असे आवाहनही श्री. वर्मा यांनी केले.

माजी केंद्रीय मंत्री आणि कैवल्यधामचे चेअरमन श्री. प्रभू म्हणाले, कैवल्यधामने गेल्या शतकभरात योगाच्या क्षेत्रात संपादित केलेले ज्ञान, अनुभव आणि समृद्ध परंपरा केवळ संस्थेपुरती मर्यादित न ठेवता जगाच्या कल्याणासाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. कैवल्यधामचे ज्ञान जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील काळात व्यापक प्रयत्न करण्यात येतील. कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कैवल्यधामच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी  ‘गोर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस’ चे श्री. राकेश सेक्सरिया यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वामी कुवलयानंदजींच्या पत्रांच्या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कैवल्यधाम परिवारातील सदस्य उपस्थित होते.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *