गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त २६ सप्टेंबर रोजी दुबईत महाराष्ट्राच्या विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण – smartmaharashtra.in थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

  


गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त २६ सप्टेंबर रोजी दुबईत महाराष्ट्राच्या विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण


दुवा कॉपी केला!


मुंबई, दि. १३: गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाची ओळख देशाबाहेरील रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे.

शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६  रोजी सायंकाळी ६ वाजता स्विस इंटरनॅशनल ऑडिटोरियम, दुबई येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात नमन, गण, जाखडी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य, जागरण-गोंधळ आदी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील विविधता, परंपरा, भक्तिभाव आणि सांस्कृतिक वैभवाचा परिचय दुबईतील रसिकांना करून देण्यात येणार आहे.महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विविध लोककला प्रकारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण व लोकजीवनाशी घट्ट नाते सांगणाऱ्या या कलाप्रकारांचे सादरीकरण दुबईतील मराठी तसेच भारतीय रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडणारे ठरणार असून, परदेशातील नव्या पिढीपर्यंतही या लोककलांचा वारसा पोहोचविण्यास यामुळे हातभार लागणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासोबतच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशाच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.

दुबईतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government


maharashtrasmart@gmail.com
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart@gmail.com

maharashtrasmart@gmail.com हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *