थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, १९ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

रेवसा गावात ‘लोकसंवाद’; पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती

रेवसा गावात ‘लोकसंवाद’; पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती

अमरावती, दि.१९ (जिमाका): कमी पाऊस, नापिकी आदी समस्यांमुळे सावकारांकडून कर्ज काढत शेती व संसाराचा गाडा हाकणारा शेतकरी हा सावकारी पाशात कसा अडकतो व त्याचा कुटुंब व समाजावर होणारा विपरीत परिणाम चफकलपणे मांडून जिल्हा उप निबंधक कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रेवसा येथील शिवतांडव गणेशोत्सव मंडळात आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात गावकऱ्यांचे प्रबोधन केले.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’,या योजनेचा गावकऱ्यांनी घेतलेला लाभ,त्यांना येत असलेल्या अडचणी आदींबाबत त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यात आल्या. अडचणींच्या सोडवणुकीसाठी उपलब्ध कार्यालये, यंत्रणा व संकेतस्थळ, पोर्टल आदींची माहिती देण्यात आली.

तत्पूर्वी, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी सेवासंकल्प मोहिमेच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाची माहिती उपस्थित गावकऱ्यांना दिली.

यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सहाय्यक निबंधक स्वाती गुडधे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निबंधक अनिरुद्ध राऊत आणि छाया देशमुख व अन्य कर्मचारी अशा एकूण १५ जणांच्या चमूने ‘सावकारी पाश’ हे पथनाट्य सादर केले. सादरीकरणानंतर प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम,२०१४ हा महाराष्ट्रातील गरिबांचे, शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे बेकायदेशीर व अनिर्बंध सावकारीच्या जाचातून व आर्थिक शोषणातून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या महत्त्वाच्या कायद्याविषयी माहिती देण्यात आली.

कृषी विभागाच्या वतीने रेवसा येथील सहाय्यक कृषी अधिकारी छाया देशमुख यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे,नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व फलोत्पादन विकास आदींबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

रेवसा गावच्या पोलीस पाटील छाया वानखडे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले व ‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून जनतेला देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीबद्दल समाधान व्यक्त केले.शिव तांडव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखडे,मंडळाचे पदाधिकारी, महिला,पुरुष व तरुण-तरुणी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे संपूर्ण राज्यभर जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून १६ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ‘लोकसंवाद’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *