
नाशिक, दि. १९ (जिमाका) : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. सार्वजनिक रुग्णालयात विविध अत्याधुनिक पद्धतीने तपासणी, औषधोपचार केले जातात. नागरिकांनी या सुविधांचा आजारपणात लाभ घ्यावा, असे आवाहन इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील बोदामवाड यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे विविध शासकीय योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गणेशोत्सवानिमित्त ग्रामीण रुग्णालय, इगतपुरी यांच्या माध्यमातून इगतपुरी पोलीस ठाणे येथे ‘श्रीगणेशा आरोग्याचा अभियान 2026’ अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बळाप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील बोदामवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपककुमार, सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गबाले, पोलीस उपनिरीक्षक एस. सी. तातळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हेमंत घरटे, दंतचिकित्सक डॉ. सचिन माकले, जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक किरण डोळस, एनसीडी समुपदेशक अश्विन अहिरराव यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. बोदामवाड म्हणाले की, नागरिकांसाठी महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजना, प्रधानमंत्री आयुष्मान योजना आहेत. या योजनेअंतर्गत विविध आजारांवर औषधोपचार केले जातात. याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत केली जाते. पात्र नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप पाहता त्यांनी आपल्या आरोग्यासाठी नियमित वेळ देणे आवश्यक आहे. जीवनशैलीत सकारात्मक बदल, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्यास मधुमेह व उच्च रक्तदाबासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. दररोज किमान 15 मिनिटे व्यायाम तसेच 15 मिनिटे श्वसनाचे व्यायाम करण्याची सवय लावावी. रक्तदाब व रक्तातील साखरेची नियमित तपासणी करावी. हे आजार अनेकदा हळूहळू वाढत असल्याने वेळेवर निदान व उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक किरण डोळस यांनी ‘लोकसंवाद’ अभियानाचे स्वरूप, उद्दिष्टे तसेच विविध शासकीय योजनांच्या जनजागृतीबाबत माहिती दिली. तसेच Bapp.org या डिजिटल माध्यमातून गणेशोत्सवाची छायाचित्रे, माहिती व आठवणी संकलित करून गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहोचविण्याचे आवाहन केले.
या शिबिरात इगतपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 36 पोलीस कर्मचारी आणि 22 नागरिकांची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक शंकांचे निरसन करण्यात आले.
०००

Leave a Reply