
नाशिक, दि. १९ (जिमाका): नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याची पूर्वतयारी सूक्ष्म नियोजनातून करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून कामांना गती द्यावी. तयारीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता राहू नये, असे निर्देश कुभमेळा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आज दुपारी ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार दिलीप बनकर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, आखाड्यांचे साधू-संत उपस्थित होते.

पालकमंत्री महाजन म्हणाले की, ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती महोदया यांच्यासह मान्यवरांना निमंत्रण देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचे परिपूर्ण नियोजन करावे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, गर्दी नियंत्रण, सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेचे काटेकोर नियोजन करावे. नियोजन करताना कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधी, विविध आखाड्यांचे साधू यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल. लोकप्रतिनिधी, साधू, महंत यांच्याशी वेळोवेळी संवाद साधण्यात येईल. सिंहस्थ महाकुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडण्यासाठी शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करावे. सिंहस्थासाठी सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले असून, ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी गती वाढवावी.

प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली. रामकुंड, कुशावर्त तसेच नील पर्वत परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रस्तावित आहे. गोदावरी आरती, दिव्य संध्या, रोषणाई, दीपप्रज्वलन, कुंभ गीत, शंखनाद आदी कार्यक्रमांसह संकेतस्थळ व कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून सिंहस्थाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येणार आहे.
कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांना गती द्यावी, कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे व्यापक स्तरावर नियोजन करावे, वस्त्रांतरगृहे, स्वच्छतागृहे, सूचना केंद्रे, सावलीची व्यवस्था आणि निवासासाठी खोल्यांची उपलब्धता याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंग देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विकास, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण आणि वाहनतळांचे नियोजन यांनाही प्राधान्य द्यावे, अश्या सूचना लोकप्रतिनिधी, साधू, महंत यांनी दिल्या.
खासदार डॉ. बच्छाव, खासदार भगरे, आमदार ढिकले, आमदार श्रीमती हिरे, आमदार श्रीमती अहिरे, उपमहापौर शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष श्रीमती तुंगार, श्री हरिगिरीजी महाराज, रवींद्रपुरी महाराज, माधवदास महाराज राठी, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, मनोज थेटे यांनीही विविध सूचना केल्या. या सुचनांचा नियोजनात समावेश करण्यात येईल. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्षतथा धर्मादाय सहआयुक्त न्या. सोनुने, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, माजी आमदार बाळासाहेब सानप, विविध आखाड्यांचे साधू, संत, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
०००

Leave a Reply