थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, २० सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

बाप्पाच्या आठवणींना मिळणार डिजिटल ओळख; ‘बाप्पा डॉट ओआरजी’वर नागरिक व गणेश मंडळांनी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन

बाप्पाच्या आठवणींना मिळणार डिजिटल ओळख; ‘बाप्पा डॉट ओआरजी’वर नागरिक व गणेश मंडळांनी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन

बुलढाणा, दि. १९: घराघरांत विराजमान होणारा बाप्पा, त्याच्याशी जोडलेल्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या परंपरा, आठवणी आणि कुटुंबाच्या गणेशोत्सवाच्या अनोख्या कथा आता डिजिटल स्वरूपात जतन होणार आहेत. महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (www.bappa.org) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक तसेच गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाची नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

आपल्या घरचा बाप्पा, आपली परंपरा डिजिटल करा

गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक घरातील बाप्पाच्या आगमनामागे एखादी परंपरा, आठवण किंवा कौटुंबिक कथा असते. या समृद्ध वारशाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी नागरिकांनी ‘बाप्पा डॉट ओआरजी’वर आपल्या घरातील गणेशोत्सवाची माहिती, परंपरा, आठवणी व छायाचित्रे नोंदवावीत.

नोंदणी करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला अधिकृत प्रमाणपत्र

आपल्या गणेशोत्सवाची माहिती यशस्वीरीत्या सादर करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सांस्कृतिक कार्य विभागाकडून कुटुंबाच्या नावाने अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर #घरोघरीबाप्पा आणि #GharoGhariBappa या हॅशटॅगसह शेअर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

नोंदणी पूर्णतः मोफत

या उपक्रमातील सहभाग आणि नोंदणी पूर्णतः मोफत आहे. नागरिकांना +91 91361 72681 या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवून किंवा Bappa.org संकेतस्थळावर तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे.

गणेश मंडळांनाही डिजिटल व्यासपीठ

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. गणेश मंडळांकडून राबविण्यात येणारे सांस्कृतिक, सामाजिक व प्रबोधनपर उपक्रम व्यापक स्तरावर पोहोचावेत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हे डिजिटल व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गणेश मंडळानेही या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.

जिल्हानिहाय नोंदणीची होणार नोंद

या उपक्रमातील नोंदणीची प्रगती जिल्हानिहाय राज्यस्तरीय डॅशबोर्डवर नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अधिकाधिक कुटुंबे आणि गणेश मंडळांनी सहभागी होत आपल्या गणेशोत्सवाच्या परंपरा, आठवणी आणि सांस्कृतिक वारसा डिजिटल स्वरूपात जतन करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *