थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, २० सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लोकसंवाद-२०२६’मधून महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जनजागृती

‘लोकसंवाद-२०२६’मधून महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जनजागृती

सांगली, दि. २०: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात १६ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत मिरज शहरातील श्री संत रोहिदास सांगलीवेस गणेशोत्सव मंडळ येथे महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेसह आरोग्य विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या योजनांचा पात्र नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समतानगर प्राथमिक शहरी आरोग्य केंद्र क्र. ७ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. पृथ्वीराज धनवडे यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने तसेच श्री संत रोहिदास सांगलीवेस गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने ‘लोकसंवाद’ व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात डॉ. धनवडे बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाच्या प्रियांका खराडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. पृथ्वीराज धनवडे यांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची सविस्तर माहिती देत पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती असणे आवश्यक असून, पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य शिबिरात उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, एचपीव्ही लसीकरण, आयुष्मान भारत कार्ड आणि आभा कार्ड याबाबतही नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. माता व बालकांचे आरोग्य, किशोरवयीन मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण तसेच आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. धनवडे यांनी केले.

शासकीय आरोग्य योजना आणि आरोग्यविषयक सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या माहितीपूर्ण उपक्रमास परिसरातील गणेशभक्त, महिला तसेच आरोग्य तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

०००० 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *