
सांगली, दि. २०: विकासाची संकल्पना केवळ भौतिक सुविधांच्या निर्मितीपुरती मर्यादित न ठेवता नागरिकांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक गरजांची पूर्तता करणाऱ्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना चांगली उद्याने, क्रीडा सुविधा, ग्रंथालये, नाट्यगृहे आदी सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविणे हाच विकासाचा व्यापक दृष्टिकोन असला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात ‘नमो उद्यान’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विटा नगरपरिषद हद्दीतील खानापूर रोडलगतच्या खुल्या जागेत विकसित करण्यात येणाऱ्या नमो उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास बाबर, विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, तहसिलदार योगेश्वर टोंपे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शेलार, मुख्याधिकारी विक्रमसिंह कदम, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, बांधकाम सभापती श्रीकांत साळुंखे, पाणीपुरवठा सभापती सुरेश पवार, नगरसेविका रूपाली मेटकरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शहरांच्या विकासासोबत नागरिकांच्या जीवनमानाचा आणि विविध गरजांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विकासाचा केंद्रबिंदू माणूस असला पाहिजे. विटा शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्याच्या शक्यतेचाही अभ्यास करण्यात येईल, असे सांगत त्यांनी पाणीपुरवठा व्यवस्था सौरऊर्जेवर आणण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. तसेच शहरातील सीसीटीव्ही व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणे व ब्लॅक स्पॉट निश्चित करावीत. उपलब्ध निधी, खर्च आणि सीएसआरच्या माध्यमातून ही व्यवस्था उभारण्याची शक्यता तपासण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या गरजांनुसार शहरातील सार्वजनिक सुविधा विकसित करताना उद्यानांसोबत सांस्कृतिक आणि शैक्षणिक सुविधांनाही महत्त्व देण्याची गरज असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. तसेच विटा शहरात नाट्यगृहाच्या विकासासाठीही प्रयत्न करण्याचे त्यांनी सूचित केले. विटा येथील नमो उद्यान खूप चांगलं व्हावं, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सुहास बाबर यांनी प्रास्ताविकात शहरातील विकासकामे व त्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या. नगराध्यक्षा काजल म्हेत्रे व उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर असून उद्यानाचे क्षेत्रफळ १३.४४ गुंठे, म्हणजेच अंदाजे १४ हजार ६३८ चौरस फूट आहे. विटा शहरातील नागरिकांना विरंगुळा, व्यायाम व मनोरंजनासाठी दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक लँडस्केपिंग, हिरवळ, वृक्षारोपण, पादचारी मार्ग, बैठक व्यवस्था, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळाचे क्षेत्र व खेळाचे साहित्य, बैठक मंडप, कारंजे, प्रकाश व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधांचा समावेश आहे.
सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले. आभार विनोद गुळवणी यांनी मानले. या कार्यक्रमास नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००

Leave a Reply