थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

ठाणेकरांचा प्रवास होणार सुलभ व पारदर्शक, ‘लोकसंवादा’तून मिळाली माहिती

अमरावती विभागातून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त – अपर मुख्यसचिव व्ही. राधा

‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत प्रादेशिक परिवहन विभागाच्या योजनांची नागरिकांना दिली माहिती

ठाणे, दि.२१ (जिमाका): ठाणे रेल्वे स्थानक (पश्चिम) येथून ठाणे शहराच्या विविध भागांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि पारदर्शक व्हावा, यासाठी बहुप्रतिक्षित ‘प्रिपेड ऑटोरिक्षा सेवा’ आणि सुसज्ज कक्षाचा भव्य शुभारंभ आज रोजी संपन्न झाला.

ठाणेकरांच्या सोयीसाठी आग्रही मागणी असलेल्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्यात रेल्वे स्थानकावरून अशा स्वरूपाची अत्याधुनिक प्रिपेड सुविधा सुरू होणारा हा पहिलाच उपक्रम ठरला आहे.

या उद्घाटन सोहळ्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी (ठाणे विभाग) हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजू सावंत, पदाधिकारी अरुण इघे, गणेश सकपाळ, सुभाष जाधव यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी, आर निसर्ग फाउंडेशनच्या प्रतिनिधी, ‘Cityflo’चे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने रिक्षाचालक आणि नागरिक उपस्थित होते.

या प्रिपेड ऑटोरिक्षा सेवेचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून ‘Cityflo’ आणि ‘आर निसर्ग फाउंडेशन’ यांच्या सहकार्याने केले जाणार आहे. यामुळे प्रवाशांना स्टेशनवरून विनाविलंब रिक्षा उपलब्ध होणार असून प्रवासापूर्वीच निश्चित भाड्याची अचूक माहिती मिळणार आहे. परिणामी भाडेवाढ, भाडे नाकारणे किंवा भाड्याबाबत होणारी अनिश्चितता पूर्णपणे दूर होऊन डिजिटल व ऑनलाइन व्यवहारांना मोठा हातभार लागणार आहे. दुसरीकडे, रिक्षाचालक बांधवांनाही एक शिस्तबद्ध, सन्मानजनक आणि सुव्यवस्थित व्यवसायाचे वातावरण या प्रणालीमुळे निर्माण होणार असून प्रवासी आणि चालक या दोन्ही घटकांना सुरक्षित व सुसूत्र सेवा मिळणार आहे.

लोकसंवादातून सुसंवादाकडे…!

या कार्यक्रमाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद’ या उपक्रमाची माहितीही उपस्थितांना सविस्तरपणे देण्यात आली. नागरिकांना शासकीय योजना, विविध लोककल्याणकारी निर्णय आणि उपक्रमांची माहिती थेट व एकाच व्यासपीठावर मिळण्याच्या दृष्टीने ‘लोकसंवाद’ हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. तसेच, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वतीने नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजना, ऑनलाईन परवाना व वाहन नोंदणी सुविधा, रस्ता सुरक्षा जनजागृती आणि पारदर्शक कार्यपद्धतीची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली.

ठाणेकरांच्या प्रवासाला सुरक्षिततेची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा प्रकल्प शहर वाहतुकीत महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *