आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – smartmaharashtra.in थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

  


आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दुवा कॉपी केला!

आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क महाराष्ट्रात राबवत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास आणि हवामान बदल प्रतिबंधासंदर्भातील उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच, अशा सर्व प्रकल्पांना राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाचवे आगा खान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले प्रिन्स रहीम आगा खान यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची येथील फेअरमाँट हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे स्वागत केले. विविध सामाजिक विकास प्रकल्प, आरोग्य सुविधा, हवामान कृती, जलव्यवस्थापन, वारसा संवर्धन आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीन पटेल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सचिव डॉ. राजेश गवांदे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ग्रामीण भागात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने केलेल्या कार्याचे कौतुक केले. जलटंचाईग्रस्त भागांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे गावांमध्ये झालेला सकारात्मक बदल उल्लेखनीय असल्याचे सांगत, अशा प्रकल्पांचा विस्तार अधिक मोठ्या क्षेत्रात करण्यासाठी राज्य शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणाऱ्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य शासन आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क यांच्यात सातत्यपूर्ण संवादासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्याबाबतही चर्चा झाली. या माध्यमातून विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यांचा विस्तार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शहरी उष्णता कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाची माहिती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली. हरित क्षेत्रवाढ, पर्यावरणपूरक नियोजन आणि हवामान कृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम राज्यातील शहरांसाठी उपयुक्त ठरतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीत प्रस्तावित बालरुग्णालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जेरियाट्रिक रुग्णालय, पुनर्वसन केंद्र, कौशल्याधारित आरोग्य सेवा प्रशिक्षण तसेच संशोधन सुविधांबाबतही चर्चा झाली. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने जेरियाट्रिक तज्ज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वागत केले. वृद्ध लोकसंख्येच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, अशा विशेष आरोग्य सुविधांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पासंदर्भातील आवश्यक माहिती शासन स्तरावर तत्काळ संकलित करून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, सांस्कृतिक वारसा संवर्धन, ऐतिहासिक स्थळांचे जतन, हरित उपक्रम आणि समुदाय सहभागावर आधारित प्रकल्पांबाबतही चर्चा झाली. महाराष्ट्रात अशा उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

प्रिन्स रहीम आगा खान यांनी महाराष्ट्रातील विविध विकास उपक्रमांमध्ये सहकार्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. राज्य शासनासोबतच्या भागीदारीतून आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास आणि सामाजिक विकास क्षेत्रातील प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील नागरिकांच्या हितासाठी नव्या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाच्या वतीने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राजशिष्टाचार, थेट परकीय गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाच्या वतीने आवश्यक तो समन्वय करण्यात आला.

00000

Source: Mahasamvad — Maharashtra Government


maharashtrasmart@gmail.com
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart@gmail.com

maharashtrasmart@gmail.com हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *