थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, १९ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

पारधी समाज बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा संकल्प करू या! — मंत्री डॉ. अशोक वुईके

पारधी समाज बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा संकल्प करू या! — मंत्री डॉ. अशोक वुईके

जिल्ह्यातील २२ पारधी बेड्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविणार

चंद्रपूर, दि. १९ : पारधी समाज भटकंती करणारा समाज असल्याने अनेक समाजबांधवांकडे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका यासह विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांचा अभाव आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित राहतात. ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून पारधी समाजबांधवांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प करू या, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

पिपरबोडी पारधी टोला (चिनोरा, ता. वरोरा) येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ व पारधी समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, चिनोराच्या सरपंच श्रीमती परचाके, धर्मेंद्र शेरकुरे, दिवाकर ननावरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, राज्य शासनाने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना विविध शासकीय सेवा व योजनांचा प्रत्यक्ष लाभ देणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील २२ पारधी बेड्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यात येतील. क्रांतिवीर समशेर सिंह पारधी यांच्या नावाने पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पॅकेज जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी सांगितले.

पारधी समाजातील अनेक कुटुंबांकडे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका यासारखी मूलभूत कागदपत्रे नाहीत. भटकंतीच्या जीवनपद्धतीमुळे अनेकांकडे स्वतःची जागा अथवा घरकुलही नाही. त्यामुळे या समाजाला शासनाच्या विविध सेवा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे पालकमंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

“वंचितांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने सेवा द्यावी. पारधी समाजाकडे पाहण्याचा पोलिसांचा दृष्टिकोनही सकारात्मक असावा. समाजात शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. राज्य शासन पारधी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे आपल्या जीवनात बदल झाला, अशी भावना पारधी समाजबांधवांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रत्येक पारधी बेड्याचे सर्वेक्षण करून कोणत्या कुटुंबाला कोणत्या योजनेची आवश्यकता आहे, कोणती कागदपत्रे उपलब्ध नाहीत आणि आतापर्यंत कोणत्या योजनांचा लाभ मिळाला आहे, याची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील एकही पात्र पारधी समाजबांधव शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिली.

सेवा संकल्प अभियानाचा लाभ घ्यावा — आमदार करण देवतळे

आमदार करण देवतळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासनाच्या विविध योजना गावागावांत आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी पारधी बेड्यावर प्रत्यक्ष भेट देऊन समाजबांधवांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या परिसरात अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत असून त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून परिसरातील ३० ते ३५ गावांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या तसेच अन्य मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न करता येतील. नागरिकांनी सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवतळे यांनी केले.

विविध योजनांच्या स्टॉलची पाहणी

कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या योजनांच्या माहिती व सेवा स्टॉलची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनांची माहिती घेतली तसेच लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. आरोग्य तपासणी शिबिरालाही त्यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन प्रदीप लोहकरे यांनी केले, तर जी. बी. सोनवणे यांनी आभार मानले.

लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कात्यायनी महिला बचत गट, खेमजाई यांना चारचाकी वाहनासाठी अर्थसहाय्य देण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अक्षय राणे यांना ट्रॅक्टरची चावी प्रदान करण्यात आली. तसेच अंकुश रानपुरे, इंदुताई आत्राम, शशिकला टेकाम, मधुकर मेश्राम, मंगला मगरे, बाबा नेताम, हितेश नन्नावरे, दिलीप शिरकुरे आदी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *