थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, २३ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

लोकसंवादातून ‘एआय व सायबर सुरक्षा’ बाबत जनजागृती

लोकसंवादातून ‘एआय व सायबर सुरक्षा’ बाबत जनजागृती

नाशिक, दि. २३ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) वाढत्या वापरामुळे डिजिटल क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असतानाच सायबर फसवणुकीचे स्वरूपही बदलत आहे. नागरिकांनी एआय, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांचा वापर करताना सजग राहावे, वैयक्तिक माहितीची गोपनीयता जपावी आणि कोणत्याही संशयास्पद संदेशाची अथवा आर्थिक व्यवहाराची पडताळणी करूनच व्यवहार करावे, असे आवाहन सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकसंवाद उपक्रमांतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मान्साराम सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात व जिजामाताजिजामाता गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालय, सटाणा येथे आयोजित ‘एआय व सायबर सुरक्षा’ या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात श्री. दीक्षित बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. आर. डी. वसाईत, डॉ. एस. बी. शेवाळे, डॉ. एन. आर. निकम, उपसंपादक किरण डोळस, आयक्यूएसी समन्वयक आर. जे. पाडवी, संगणक विभागाच्या श्रीमती शिरसाट, श्रीमती रौंदळ, श्रीमती भामरे यांच्यासह अधिकारी व विद्यार्थी तसेच जिजामाता गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मालकरे व विद्यार्थी उपस्थित होते.

एआयच्या माध्यमातून बनावट आवाज, फेक व्हिडिओ, फोटो आणि सोशल मीडिया प्रोफाइल तयार करून फसवणूक केली जाऊ शकते. तसेच ऑनलाइन टास्क, बनावट विवाहविषयक प्रोफाइल आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावानेही नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्यामुळे कोणताही फोन, संदेश, व्हिडिओ किंवा ऑनलाइन प्रोफाइल खरे आहे असे गृहीत न धरता त्याची स्वतंत्रपणे पडताळणी करावी, असे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर प्रवासाचे लोकेशन, घर रिकामे असल्याची माहिती, वैयक्तिक फोटो तसेच कुटुंबीयांची अनावश्यक माहिती सार्वजनिकपणे शेअर करू नये. डिजिटल खाते सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत व स्वतंत्र पासवर्डसोबत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करावे. ओटीपी, पासवर्ड किंवा प्रमाणीकरण कोड कोणालाही देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक च्या वतीने लोकसंवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाची माहिती थेट समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत मिळालेली माहिती आपल्या कुटुंबीयांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन उपसंपादक श्री डोळस यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगिता साळुंके यांनी केले, तर आभार डॉ. पी. आर. देशमुख यांनी मानले.

00000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *