
मुंबई, दि. ४: सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून जनसेवेसोबतच आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांच्या नियोजनातून ही रॅली उत्साहात पार पडली.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित या सायकल रॅलीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सहभाग’ याचा संदेश दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेली रॅली गेटवे ऑफ इंडिया मार्गे एनसीपीए, मरीन ड्राईव्ह येथे पोहोचून उत्साहात संपन्न झाली.

या रॅलीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, तहसीलदार डॉ. मानसी मार्लेवार, माय भारतचे उपसंचालक अनुप इंगवले, नायब तहसीलदार प्रभाकर नाईक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
0000
