थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

विश्व मैत्री दिवस समस्त मानवतेचा उत्सव व्हावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विश्व मैत्री दिवस समस्त मानवतेचा उत्सव व्हावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. ४ : भगवान महावीरांनी दिलेली सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्याची शिकवण ही केवळ धार्मिक तत्त्वे नसून शांततापूर्ण, न्यायपूर्ण आणि मानवी समाजाच्या निर्मितीचा आधार आहे. आज जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाचा सामना करीत असताना भगवान महावीरांचा अहिंसा, क्षमा आणि मैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे. क्षमापना आणि विश्व मैत्रीचा संदेश हा केवळ एका धर्म किंवा समाजापुरता मर्यादित न राहता संपूर्ण मानवतेचा उत्सव बनावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

भारत जैन महामंडळातर्फे आराध्य भक्ती पार्क डोम, घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे आयोजित सामूहिक क्षमापना, विश्व मैत्री दिवस आणि जैन समाज रत्न अलंकरण समारोहात राज्यपाल बोलत होते.

राज्यपाल म्हणाले की, जैन दर्शनातील अनेकांतवाद आपल्याला सत्याचे अनेक पैलू असू शकतात, हे शिकवतो. इतरांचे दृष्टिकोन समजून घेणे, मतभेदांचा आदर करणे आणि संवादाच्या माध्यमातून समाधान शोधणे ही शांततेच्या दिशेने महत्त्वाची पावले आहेत. क्षमापना पर्व हे आत्मचिंतन, आत्मशुद्धी आणि संबंध सुधारण्याची संधी आहे. आपली चूक स्वीकारून इतरांची क्षमा मागणे ही कमजोरी नसून आंतरिक शक्तीचे प्रतीक आहे. ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ ही उक्ती क्षमेचे महत्त्व अधोरेखित करते.
जैन धर्मातील मैत्रीचा भाव हा केवळ मानवापुरता मर्यादित नसून समस्त जीवसृष्टीप्रती करुणा, मैत्री आणि कल्याणाची भावना जोपासणारा आहे. प्रत्येक जीवाला आपल्यासमान मानल्यास हिंसा, शोषण आणि द्वेषापासून दूर राहता येते. क्षमा, करुणा आणि मैत्रीचा स्वीकार दैनंदिन जीवनात केल्यास सामाजिक संघर्ष आणि कटुता कमी होण्यास मदत होईल, असेही राज्यपालांनी सांगितले.

भगवान महावीरांच्या अहिंसेच्या परंपरेचा महात्मा गांधींच्या विचारांवरही प्रभाव होता. गांधीजींचे आध्यात्मिक मार्गदर्शक श्रीमद् राजचंद्रजी यांनी त्यांच्या विचारांना महत्त्वपूर्ण दिशा दिली. भगवान महावीरांची अहिंसेची परंपरा आणि श्रीमद् राजचंद्रजींचे आध्यात्मिक मार्गदर्शन यांनी गांधीजींच्या नैतिक चिंतनाला समृद्ध केले. ही भारताची महान सांस्कृतिक आणि सभ्यतागत परंपरा असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

भारत जैन महामंडळाचे योगदान उल्लेखनीय
भारत जैन महामंडळाच्या १२६ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उल्लेख करून राज्यपालांनी संस्थेने जैन धर्मातील तत्त्वे, आध्यात्मिक मूल्ये, सामाजिक एकता आणि मानवसेवेची भावना पुढे नेण्यासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. या महत्त्वपूर्ण आयोजनाबद्दल त्यांनी भारत जैन महामंडळाला शुभेच्छा दिल्या.

जैन समाजाने सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत सहभाग वाढवावा – मंत्री मंगलप्रभात लोढा
यावेळी कौशल्य विकास इतर खात्यांचा उल्लेख करावा मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, येथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये एक संस्था असून जैन समाजातील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांत सेवा कार्य करीत आहेत. मात्र, आता जैन समाजाने एखादा सामाजिक उपक्रम सामूहिकपणे स्वीकारण्याच्या दिशेने पुढे जाण्याची गरज आहे. आयुष्मान भारत योजना, तलाव स्वच्छता किंवा केंद्र व राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीत संपूर्ण जैन समाजाने सहभाग घेतल्यास शासन आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल.
दुष्काळाच्या परिस्थितीतही जैन समाजाने सेवाभावाने पुढे यावे, असे आवाहन करून मंत्री लोढा म्हणाले की, अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची, शेतीला पाण्याची तसेच पशुधनाला चारा आणि पाण्याची आवश्यकता आहे. भगवान महावीरांच्या अहिंसेचा संदेश मानणाऱ्या समाजाने अशा संकटकाळात शासनासोबत काम करून सेवाभाव पुढे न्यावा.

जैन समाज रत्न पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान
समाजसेवा, उद्योग आणि जनकल्याणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल जैन समाज रत्न पुरस्काराने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आमदार पराग शाह, सुखराज नाहर, कैलाशचंद जैन आणि सुरेश गोयल यांचा सन्मान करण्यात आला. राज्यपालांनी सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यातून समाजातील इतरांनाही सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमास मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार पराग शाह, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ख्यालीलाल तातेड, शिवलाल पोखरणा, जैन मुनी मुनिराज मुक्त निलय विजय, आचार्य साध्वी श्री योगक्षेम प्रभा, राष्ट्रसंत गुरुदेव श्री नम्रमुनी तसेच विविध जैन संप्रदायांचे आचार्य, संत, मुनी आणि साध्वी उपस्थित होते.
भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष भुपेश कोठारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.