थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा.- मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा.- मंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. १८ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच त्यांच्यात चांगले संस्कार, कला-क्रीडा कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविणे आवश्यक आहे. शिक्षक, प्रशासन, लोकप्रतिनिधी, पालक, माजी विद्यार्थी आणि समाजाच्या सहभागातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा गुणवत्तापूर्ण विकास साधता येईल. नाशिक महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या आगामी काळात ५० हजारांपुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने भोरे सभागृहात आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्यात मंत्री भुसे बोलत होते. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित रंजन, सह आयुक्त स्मिता झगडे, मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी, सेवानिवृत्त शिक्षक संजय कळमकर, गटनेते अजय बोरस्ते, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पुरस्कारार्थी शिक्षकांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन सक्षम करणे हे अत्यंत महत्त्वाचे सामाजिक कार्य आहे. महापालिका शाळांमधील गुणवत्तावाढीबरोबरच पालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. कोल्हापूर, गडचिरोली, वाशिम तसेच पुणे जिल्ह्यातील विविध शाळांच्या यशस्वी प्रयोगांची उदाहरणे देताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, शिक्षकाने निर्धार केला आणि त्याला लोकप्रतिनिधी व प्रशासनाची साथ मिळाली, तर शाळेचे चित्र बदलू शकते.

‘शिक्षणाचा कुंभ’ उपक्रम राबवावा

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील काळात कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका शाळांमध्ये स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी, सुरक्षित इमारती, वाचनालय, ई-सुविधा, तिरंगा तसेच कला-क्रीडा सुविधांची उपलब्धता याकडे लक्ष द्यावे. कुंभमेळ्यापूर्वी नाशिकमध्ये ‘शिक्षणाचा कुंभ’ हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे. शिक्षणाचे महत्त्व घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबवावा, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले.

राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया

राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असून, पहिल्या टप्प्यात १३ हजार शिक्षकांची ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून विना-मुलाखत नियुक्ती करण्यात येत आहे. काही अनुदानित संस्थांनीही विना-मुलाखत शिक्षक नियुक्तीस सहमती दर्शविली आहे. अंतर्गत वाद असलेल्या संस्थांमध्ये शासनामार्फत थेट शिक्षक नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. नवीन शिक्षक उच्चशिक्षित असून, विद्यार्थ्यांना केवळ पाठांतराधारित शिक्षण न देता त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे शिक्षण देण्यावर भर आहे. विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक भरतीमध्ये कला-क्रीडा शिक्षकांनाही स्थान देण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकेने ३६ शिक्षक पदांची मागणी केली असून, त्यापैकी ३१ पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्येही शिक्षकांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे.

हिवाळी शाळेतील प्रयोग प्रेरणादायी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण देताना शिक्षक केशव गावित यांच्या समर्पित कार्याचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले. मर्यादित सुविधांमध्येही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत त्यांच्यातील विविध गुणांना वाव देण्याचे काम या शाळेत होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करून गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम, सर्जनशील आणि जबाबदार भावी नागरिक घडवावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी केले.

महानगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर पोहोचले आहेत, ही अभिमानाची बाब आहे. शिक्षकांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव असून, शिक्षकांचे मनोबल वाढविणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे, असे उपमहापौर शिंदे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

यावेळी निवृत्त शिक्षक संजय कळमकर, आदर्श शिक्षक सचिन चिखले व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उपशिक्षिका कुंदा बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महानगरपालिकेच्या शैक्षणिक पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व एनएमएमएस स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.

या आदर्श शिक्षकांचा झाला सन्मान

१. रंजना सखाराम मांडे, उपशिक्षिका, मनपा शा. क्र. ७८, अंबडगाव

२. ज्योती त्र्यंबकराव भागवत, उपशिक्षिका, मनपा शा. क्र. २१, कार्बननाका

३. संगीता बाळासाहेब आढाव, उपशिक्षिका, मनपा शा. क्र. ४९, पंचक

४. संध्या उमाकांत जाधव, उपशिक्षिका, मनपा शा. क्र. ७१, रायगडचौक

५. शोभा सुनीलकुमार मगर, उपशिक्षिका, मनपा शा. क्र. ७१, रायगडचौक

६. योगेश महारु सूर्यवंशी, उपशिक्षक, मनपा शा. क्र. ७४, जाधव संकुल

७. नाझ परवीन नदीम खान, मुख्याध्यापक, मनपा शा. क्र. ८४, वडाळागाव

८. तब्बसुम अब्दुल कादीर शेख, उपशिक्षिका, मनपा शा. क्र. ८४, वडाळागाव

९. राजश्री किशोरकुमार सोनेरी, मुख्याध्यापक, मनपा शा. क्र. १३, दिंडोरी नाका

१०. सचिन एकनाथ चिखले, उपशिक्षक, मनपा शा. क्र. २७, सातपूर कॉलनी

११. दिलीप काळू गावित, उपशिक्षक, बी. डी. भालेकर, नाशिक

१२. अर्चना दिलीप कापडणीस, उपशिक्षिका, म्हसरूळ, नाशिक

१३. रंजना विजय पाटील, उपशिक्षिका, अभिनव बालविकास मंदिर, नाशिक

१४. कुंदा जयवंत बच्छाव, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उपशिक्षिका, मनपा शाळा क्रमांक १८, आनंदवली

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *