थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

• अचूक पंचनामे करण्याचे निर्देश

• नांदेड जिल्ह्यातील उर्वरित दोन तालुक्यांचाही समावेश करणार 

नांदेड, दि. २८ : मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाडा व विदर्भाचा दौरा करून राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, यासाठी अचूक पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्धापूर येथे दुष्काळसदृश पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. पावसातील खंड, पिकांचे नुकसान आणि सद्यःस्थितीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली 11 मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक दर मंगळवारी घेण्यात येणार असून, शेतकरी, शेतमजूर, अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी समिती काम करणार आहे. राज्यात पिकांची परिस्थिती गंभीर असून, रब्बी हंगामही अडचणीत आला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पीक विम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे अचूक होणे आवश्यक आहे. सरसकट मदतीपेक्षा अचूक पंचनाम्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे मदत मिळू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळाशी संबंधित 11 विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, मदतकार्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असून, दिवाळीपूर्वी मदत मिळावी, अशी शासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या हिताला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणे अद्याप बाकी आहे. या दोन्ही तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

ज्या धरणांमध्ये सध्या पाणीसाठा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी उभी असलेली पिके वाचविण्यासाठी एक पाणी देण्याबाबत शासन विचार करीत आहे. तसेच नगरपंचायत क्षेत्रात बळीराजा पाणंद रस्ते आणि जीरामजी योजना लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय अधिकारी पूनम पाटील, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, तालुका कृषी अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

महसूलमंत्र्यांनी स्वीकारली शेतकरी व नागरिकांची निवेदने  

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्धापूर येथील दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केल्यानंतर नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांशी संबंधित निवेदने स्वीकारली.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित निवेदनांची दखल घेत, नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *