थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

हृदयाचा प्रत्येक ठोका महत्वाचा; वेळेवर उपचारासाठी ‘स्टेमी महाराष्ट्र’चा आधार

‘सेवा संकल्प अभियाना’तून विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीला गती

मुंबई, दि. २८ : हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये हृदयविकाराचे तातडीने निदान आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ५० लाखांहून अधिक ईसीजी तपासण्या करण्यात आल्या असून, त्यामधून ३४ हजारांहून अधिक स्टेमी रुग्णांचे तसेच १ लाख ४५ हजारांहून अधिक इतर गंभीर हृदयविकाराच्या रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.

‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत राज्यात २,४१५ स्पोक शासकीय आरोग्य केंद्रे  (जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र) आणि कॅथलॅब उपलब्ध असलेली ९९ हब रुग्णालये (खासगी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये, धर्मादाय रुग्णालये) कार्यरत आहेत.  स्पोक केंद्रांमध्ये प्राथमिक पातळीवर ईसीजी तपासणी करून त्याचा अहवाल क्लाऊडवर अपलोड होतो. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने काही मिनिटांत ईसीजीचे विश्लेषण केले जाते. स्टेमीचे निदान झालेल्या रुग्णाला स्पोक रुग्णालयात सुविधा उपलब्ध असल्यास तातडीने थ्रोम्बोलायसिस उपचार देण्यात येतात.  पुढील उपचारासाठी रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने संबंधित हब रुग्णालयात पाठविण्यात येते.

३४ जिल्ह्यांत हृदयविकार उपचाराचे जाळे

सुरुवातीला राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला. सध्या महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये २,४१५ स्पोक आरोग्य केंद्रे या प्रकल्पाशी जोडण्यात आली आहेत. तसेच ९९ हब रुग्णालये प्रगत हृदयविकार उपचारांसाठी सज्ज आहेत. हब रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली  उपचार, अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, बायपाससारख्या सुविधा उपलब्ध आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना संबंधित उपचारांचा लाभ मिळतो. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने योग्य उपचार केंद्राशी जोडणे शक्य होत आहे.

ईसीजी तपासणीला प्राधान्य

हृदयविकाराचा संशय असलेल्या रुग्णाची तातडीने ईसीजी तपासणी करणे हा स्टेमी प्रकल्पातील महत्त्वाचा भाग आहे. छातीत दुखणे, छातीत दडपण येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे, चक्कर येणे, मळमळ होणे किंवा वेदना जबडा, मान, खांदा अथवा हाताकडे जाणे अशी लक्षणे आढळल्यास विलंब न करता वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, तंबाखूचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, असंतुलित आहार, अनुवंशिकता आणि मानसिक ताण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक तपासणीसह लक्षणे दिसताच तातडीने ईसीजी करणे महत्त्वाचे आहे.

हृदयाचा प्रत्येक ठोका महत्वाचा

जागतिक हृदय दिनानिमित्त ‘हृदयाचा प्रत्येक ठोका महत्वाचा’ हा संदेश देत नागरिकांनी आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. हृदयविकाराची लक्षणे दुर्लक्षित न करता वेळेत ईसीजी आणि आवश्यक उपचार घेणे, तसेच निरोगी आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि व्यसनांपासून दूर राहणे, हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

स्टेमी म्हणजे काय?

STEMI म्हणजे ST Elevation Myocardial Infarction. हा हृदयविकाराच्या झटक्याचा एक गंभीर प्रकार असून, हृदयाच्या काही भागाला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबल्यामुळे अपुऱ्या ऑक्सिजनमुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

स्टेमी महाराष्ट्र कार्यक्रमात समाविष्ट शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक ईसीजी उपकरणाच्या सहाय्याने हृदयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णाचा ईसीजी काढून क्लाऊडवर अपलोड होतो. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर  आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने १० मिनिटांत ईसीजीचे विश्लेषण करून  अहवाल इंटरनेटच्या माध्यमातून संबंधित रुग्णालयाला पाठविला जातो.

यासाठी बंगळुरूस्थित ट्रायकॉग हेल्थ या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

“हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. ग्रामीण भागातील नागरिकांनाही वेळेत ईसीजी तपासणी, अचूक निदान आणि आवश्यक उपचार मिळावेत, या उद्देशाने ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाचा राज्यभर विस्तार करण्यात आला आहे. आज ३४ जिल्ह्यांमध्ये २,४१५ स्पोक आरोग्य केंद्रे आणि ९९ हब रुग्णालयांच्या माध्यमातून हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीच्या उपचारांशी जोडले जात आहे. या प्रकल्पांतर्गत ५० लाखांहून अधिक ईसीजी तपासण्या होणे ही या उपक्रमाची व्यापक पोहोच दर्शविणारी बाब आहे. नागरिकांनी हृदयविकाराची लक्षणे दुर्लक्षित न करता तातडीने ईसीजी तपासणी करून आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावेत. ‘हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.”

                                                      प्रकाश आबिटकर

                                                      मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.

 

“हृदयविकाराची लक्षणे ओळखणे आणि वेळ न दवडता योग्य उपचार घेणे ही जनजागृतीची महत्वाची बाब आहे. ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाच्या माध्यमातून ईसीजी तपासणीची सुविधा नागरिकांच्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकाराचा धोका असलेल्या नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीसह हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वेळेवर निदान आणि उपचारातून अनेक गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकतात.”

                                                 मेघना साकोरे-बोर्डीकर

                                                 राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.

 

 

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *