थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, २६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण; जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र रुग्णांच्या सेवेत

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण; जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र रुग्णांच्या सेवेत

चंद्रपूर, दि. 26 : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डायलिसिस केंद्राचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या केंद्रामुळे मूल व लगतच्या परिसरातील किडनी विकाराच्या रुग्णांना डायलिसिसची  सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.

उद्घाटन सोहळ्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंत हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रवीण पंत, पोटदुखे हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रसाद पोटदुखे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अभिषेक दीक्षित, प्रा. महेश पानसे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

लोकार्पणानंतर केंद्रामध्ये प्रत्यक्ष डायलिसिस सेवेला सुरुवात करण्यात आली. सिंदेवाही येथील नंदलाल मेश्राम या रुग्णावर उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली या केंद्रातील पहिले डायलिसिस करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे यापूर्वी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे मूल व परिसरातील रुग्णांना त्यांच्या जवळच डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील डायलिसिस केंद्रावरील रुग्णांचा ताण कमी होण्यासही मदत होईल.

किडनी विकाराच्या रुग्णांना नियमितपणे डायलिसिससाठी दूरवर प्रवास करावा लागू नये आणि आवश्यक आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हावी, या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे केंद्र जनतेच्या सेवेसाठी  कार्यान्वित झाले असून परिसरातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रामटेके यांनी केले.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *